कणकवली : समाजातील एका व्हॉट्सअॅप गु्रपवर टाकलेल्या पोस्टच्या वादातून कणकवली बांधकरवाडी शाळा नं.2 नजीक राहणारे सचिन आनंद पवार (41) यांना जमावाने जाब विचारला, त्यात आपल्यावर सुरीने हल्ला झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यात त्यांच्या पोटाला, छातीला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे. हि घटना मंगळवारी सायंकाळी 4 वा.च्या सुमारास बांधकरवाडी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही बाजूचे जबाब नोंदवत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली होती.
सचिन पवार हे पत्नी व मुलांसह बांधकरवाडी येथे राहतात. ते सध्या शिरवंडे येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत. समाजातील व्हॉट्सअॅप ग्रुपवर त्यांनी एक पोस्ट टाकली होती. दरम्यान मंगळवारी सायंकाळी बांधकरवाडी येथे त्या समाजातील बांधवांचा कार्यक्रम सुरु होता. या पोस्टबाबत विचारणा करण्यासाठी सचिन पवार यांना बोलावले मात्र ते गेले नाहीत. त्यामुळे पोस्टच्या रागातून जमावाने आपल्या घराकडे येवून आपणास मारहाण केली. त्यात आपणावर सुरीने हल्ला झाल्याचे सचिन पवार यांनी सांगितले.
जखमी सचिन पवार यांच्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान याप्रकरणी कणकवलीचे पोलिस हवालदार सुनिल वेंगुर्लेकर यांनी घटनास्थळी जावून दोन्ही बाजूचे जबाब नोंदवले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु होती.