दोडामार्ग : कळणे घाटातील तीव्र वळणावर बुधवारी सकाळी 11.50 वा. च्या सुमारास एक मालवाहू ट्रक अडकला. ट्रक अडकताच रस्त्याचा मोठा भाग व्यापला गेला आणि काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. एक मालवाहू ट्रक दोडामार्गहून बांदाच्या दिशेने बुधवारी सकाळी 11.50 वा. च्या सुमारास जात होता. कळणे घाटी उतरत असताना एका तीव्र वळणावर ट्रकमध्य अचानक बिघाड झाला. त्यामुळे तो रस्त्यातच उभा राहिला. परिणामी वाहतूक खोळंबली. याची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि वाहतूक एकेरी मार्गाने सुरळीत करण्याचे नियोजन केले.
वाहनचालकांना सावधगिरीने वाहन चालवण्याचे आवाहन करण्यात आले. ट्रक हटवण्याचे काम सुरू करण्यात आले असून, रस्त्यावर कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. मात्र तीव्र वळण आणि अरुंद रस्ता यामुळे या भागात मोठ्या वाहनांच्या वाहतुकीला वारंवार अडथळा निर्माण होतो, अशी माहिती स्थानिकांनी दिली.