कणकवली : कलमठ ग्रामपंचायतीला कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी भेट दिली.  (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Model Gram Panchayat | कलमठसारखी आदर्श ग्रामपंचायत बघितल्याचा मला मोठा आनंद

कोकण विभागीय आयुक्तांचे गौरवोद्गार; सरपंचांसह ग्रामस्थांचे कौतुक

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : कलमठसारख्या आदर्श ग्रामपंचायत बघितल्याचा मला आनंद झाला आहे. माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे याठिकाणी मिळाली. मी कुठल्याही ग्रामपंचायतमध्ये गेल्यानंतर हे अजून करायचे आहे. हे अजून केले नाही, अशी उत्तरे मिळतात. परंतु, कलमठ ग्रामपंचायत सरपंच संदीप मेस्त्री यांना जे जे विचारले, ते ते ग्रामपंचायतने केले आहे. ग्रामपंचायतची रंगरंगोटी किंवा परिसर स्वच्छता पाहून मी समाधानी होत नाही. माझा पहिला प्रश्न असतो, कचर्‍याचे काय करता? जी ग्रामपंचायत कचर्‍याचे व्यवस्थापन करत नाही, ती ग्रामपंचायत काय करू शकत नाही. अनेक ग्रामपंचायती शो करणार्‍या असतात. कलमठ ग्रामपंचायतीचे कचर्‍याचे नियोजन व महिलांसाठी सॅनिटरी पॅडचा उपक्रम स्तुत्य आहे. स्वच्छ सुंदर कलमठ हा कचरा निर्मूलनाचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले.

कलमठ ग्रामपंचायतला कोकण विभागीय आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी भेट दिली. यावेळी कणकवली तहसीलदार कार्यालयाच्या वतीने महसूल दिनाच्या निमित्ताने सत्यपनद्वारे हयात प्रमाणपत्र वाटप डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कलमठ ग्रामपंचायतच्या वतीने विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांचा सत्कार सरपंच संदीप मेस्त्री यांनी शाल, पुष्पगुच्छ व वृक्ष देवून केला.

यावेळी कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, अप्पर आयुक्त डॉ. मानिक दिवे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्यकार्यकारी रविंद्र खेबुडकर, उपमुख्यकार्यकारी अधिकारी श्री. परब, कणकवली प्रांताधिकारी जगदिश कातकर, तहसिलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण , विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, संजय कवटकर, प्रमोद ठाकूर, रामचंद्र शिंदे , सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंच दिनेश गोठणकर, माजी सरपंच महेश लाड,माजी उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, ग्रा.प.सदस्य नितीन पवार श्रेयश चिंदरकर ,अनुप वारंग ,सचिन खोचरे, स्वाती नारकर सुप्रिया मेस्त्री, पपू यादव, बाबू नारकर, तेजस लोकरे, प्रथमेश धुमाळे , ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर, आशा सेविका, अंगणवाडी सेविका ,ग्रामपंचायत कर्मचारी , आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी म्हणाले, कलमठ ग्रामपंचायतीच्यावतीने गावातील जे भूमिहीन आहेत, त्यांच्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतुन घरे बांधण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. महाऑनलाईन आपले सरकारच्या माध्यमातून तालुक्याच्या ठिकाणी मिळणार्‍या दाखल्यांच्या सेवा गावातच सुरु झाल्या आहेत. या गावात जे उपक्रम राबवले जात आहेत. ते उपक्रम अन्य गावांमध्ये राबविण्यासाठी आदर्शवत ठरेल, असे काम या कलमठ ग्रामपंचायतने उभे केले आहे. यापेक्षाही चांगले उपक्रम आपल्या व्हिडीओमधून पाहत आहे. व्यस्त कार्यक्रमांमुळे जर ग्रामपंचायतला जर भेट दिली नसती तर माझं काहीतरी चुकलं असतं , असे वाटत राहिले असते. आभार ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर यांनी मानले.

यावेळी प्रस्ताविक करताना सरपंच संदीप मेस्त्री म्हणाले, कलमठ ग्रामपंचायतच्यावतीने नाविन्य उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून आतापर्यंत 90 दाखले शालेय विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतच्या माध्यमातून दिले आहेत. महिलांसाठी दरमहिन्याला 5 सॅनिटरी पॅड ग्रामपंचायतच्या माध्यमातून देत आहोत. वॉटर एटीएम, शाळांना सीसीटीव्ही, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये प्रथम क्रमांक, आपली ग्रामपंचायत आयएससो मानांकन प्राप्त असून कर्मचार्‍यांची उपस्थिती फेस अटेंड्स मशीनरवर करण्यात आली आहे. कचराबाबत ग्रामपंचायतच्या माध्यमातून ओला व सुका कचरा गोळा केला जात आहे. त्याच्यावर प्रक्रिया करणारी युनिटदेखील आपल्या ग्रामपंचायत मध्ये बसवण्यात आलेले आहेत.

घरोघरी जाऊन आम्ही कचरा गोळा करतो. कलमठ गावामध्ये 32 वाडी, कॉलनी, नगर असून गाव मोठे आहे, तरीदेखील कचर्‍यासंदर्भात या 1 ऑगस्टपासून विशेष मोहीम घेऊन स्वच्छ सुंदर कलमठ गाव हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
संदीप मेस्त्री, सरपंच

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT