ओटवणे : ओटवणे-मांडवफातरवाडी येथील रामचंद्र विष्णू वर्णेकर यांच्या घरात भरदिवसा मंगळवारी दुपारी 12 च्या सुमारास अज्ञात चोराने घरात प्रवेश करत कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने लंपास केले. एकूण चार तोळे सोन्याचे दागिने चोरीस गेले आहेत. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला. घरात कुणीही नसल्याची संधी साधत चोरट्याने हा डाव साधला. त्यानंतर मोटारसायकलने बांदामार्गे गोव्याच्या दिशेने धूम ठोकली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामचंद्र वर्णेकर यांची पत्नी आपले घर बंद करून शेजारील घरी गेल्या होत्या. चोरटयाने ही संधी साधत घरात प्रवेश केला व कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरले. भरदिवसा झालेल्या या चोरीमुळे एकच खळबळ उडाली. ओटवणेत अशा चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत.
सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत चोरटयाचा शोध घेतला. श्री. वर्णेकर यांची पत्नी घरी आली असता हा प्रकार उघड झाला. या घटनेवेळी रामचंद्र वर्णेकर हे माजगाव येथे कामावर गेले होते. दरम्यान दुपारी 1 वा. च्या सुमारास श्री. वर्णेकर यांच्या घराजवळ एक पिवळ्या रंगाची मोटार सायकल उभी असल्याचे काहींनी पाहिले.
रंजना वर्णेकर घरी आल्या त्यावेळी मुख्य दरवाजा आतून बंद होता. यावरून चोरट्याने मागच्या दराने पळ काढल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळी पोलिसांनी डॉग स्कॉडला पाचरण केल, मात्र उशीरापर्यंत चोराचा मागोवा लागला नाही. पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, बिट हवालदार मनोज राऊत यांनी घटनास्थळी भेट दिली.
ओटवणे पोलिस पाटील शेखर गावकर, संतोष तावडे, विनायक वरणेकर व ग्रामस्थ पोलिसांसमवेत चोरटयाचा शोध घेत होते. ओटवणे गावात यापूर्वीही अशा घटना दरवर्षी घडल्या आहेत. त्यामुळे गावतील लोकांना सतर्क राहण्याची सूचना पोलिसांनी दिली आहे .गावच्या महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याची मागणीही ग्रामस्थांमधून होत आहे.