

सावंतवाडी : तालुक्यात शुक्रवारी (दि. १४) सायंकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या मुसळधार पावसात ओटवणे-गवळीवाडी येथील सुनीता बुराण यांच्या घरावर वीज कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत सुनीता बुराण आश्चर्यकारकरीत्या बचावल्या असून, घराचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस सुरू होता. मध्यरात्रीच्या सुमारास सुनीता बुराण आपल्या घरात गाढ झोपेत असताना अचानक मोठा आवाज झाला आणि त्यांना विजेचा धक्का जाणवला. प्रसंगावधान राखत त्या तात्काळ घराबाहेर पडल्या आणि मदतीसाठी आरडाओरड केली. त्यांचा पुतण्या तातडीने घटनास्थळी धावून आला आणि त्याने त्यांना धीर दिला.
या दुर्घटनेत घराची भिंत कोसळली असून, विजेचे मीटर जळून खाक झाले आहे. घरातील इतर सामानाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या आकस्मिक संकटामुळे सुनीता बुराण यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.
घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बुराण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी शासनाने या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून सुनीता बुराण यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.