कणकवली : कणकवलीतील भालचंद्र ज्वेलर्स या सोने-चांदी दुकानातील चोरीप्रकरणी पोलिसांनी तपासाची चके्र गतिमान केली आहे. अधिकारी आणि कर्मचार्यांच्या 25 जणांच्या वेगवेगळ्या तीन पथकाकडून चोरट्यांचा तपास केला जात आहे. त्यासाठी एक पथक जिल्हयाबाहेर गेले आहे. दरम्यान चोरट्यांनी चोरी करून पळून जाताना मराठा मंडळच्या मागील भागात चोरी केलेले मुद्देमालाचे विलगीकरण करत आवश्यक नसलेली 180 ग्रॅम चांदीची मोड आणि प्लास्टिकचे रिकामी बॉक्स टाकून पसार झाले. या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
बुधवारी पहाटे कणकवलीतील भालचंद्र ज्वेलर्स या कणकवली पोलिस स्टेशनपासून सुमारे 200 मीटर अंतरावर असलेल्या दुकानात चोरी झाली होती. चार अज्ञात चोरट्यांनी हातात हॅण्डग्लोज, चेहरे झाकलेले आणि रेनकोट अशा पेहरावात दुकानाच्या शटरची लोखंडी उचकटून दुकानातील 15 किलो चांदीचे दागिने व वस्तू, 5 तोळे सोन्याचे दागिने आणि काही बेंटेक्सचे दागिने असे सुमारे सव्वादहा लाखाचा ऐवज चोरला होता. या चोरट्यांच्या तपासासाठी पोलिस यंत्रणेने नियोजनबद्ध आखणी करत पथके तैनात केली आहेत.
जिल्हयातील चेक नाक्यांवर नाकाबंदी तसेच सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत. चोरट्यांनी चोरी करून सोनगेवाडी मार्गे मळयातून मराठा मंडळच्या मागील भागात गेले. तेथे चोरलेल्या ऐवजाचे सॉर्टिंग केले. काही चांदीची मोड आणि बॉक्स तेथेच टाकून ते पसार झाले. चोरट्यांनी महामार्गावर गाडी उभी करून चोरीचा डाव साधला आणि ते पळून गेले असावेत किंवा ते रेल्वेनेही पळून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने सर्व शक्यतांचा तपास पोलिस करत आहेत. यासाठी अति. पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली डिवायएसपी घनश्याम आढाव, कणकवलीचे पोलिस निरीक्षक अतुल जाधव आणि एलसीबीचे पोलिस निरीक्षक श्री. कोल्हे यांची टिम तपास करत आहे.
दरम्यान वेगवेगळ्या भागातील हिस्ट्रीसीटरवरील चोरट्यांचाही तपास केला जात आहेत. त्यासाठी एक पथक जिल्हयाबाहेर रवाना झाले आहे. जिल्हयासह इतर भागातील सीसीटीव्ही कॅमेरेही तपासले जात आहेत.