वैभववाडी ः आतापर्यंत आम्ही पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ करताना पाहिले होते. आज ती संधी तुम्ही आम्हाला दिली आहे. स्थानिक तरुणांनी एकत्र येऊन सुरू केलेला गूळ निर्मिती उद्योग हा आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. हा प्रकल्प जिल्ह्याच्या अर्थकारणाला गती देईल. त्याचबरोबर भावी पिढीला प्रोत्साहन देणारा हा उद्योग आहे. जिल्ह्यातून तरुण पिढीचे होणारे स्थलांतर थांबवायचे असेल तर अशा प्रकारचे उद्योग धंदे जिल्ह्यात निर्माण व्हायला पाहिजे. तुम्ही आत्मविश्वासाने व नियोजनबद्धपणे या प्रकल्पासाठी काम करा. तुमच्या पाठीशी मी सदैव उभा आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
नाधवडे येथील अष्टकृपा प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला स्वयंचलित गूळ निर्मिती उद्योग उभारण्यात आला आहे. या उद्योगाचे मोळी पूजन आणि लोगोचे अनावरण पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. सिंधुदुर्ग बँक संचालक दिलीप रावराणे, पणन महासंघाचे संचालक प्रमोद रावराणे, वैभववाडी भाजप अध्यक्ष सुधीर नकाशे, भालचंद्र साठे, दिगंबर पाटील, बाप्पी मांजरेकर, राजेंद्र राणे, महेश संसारे, नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, उपनगराध्य प्रदीप रावराणे, सरपंच लीना पांचाळ, गुलाबराव चव्हाण, प्राची तावडे, स्नेहलता चोरगे, बंड्या मांजरेकर, महेश गोखले, उद्योजक हनुमंत नारकर, उद्योजक दिगंबर इस्वलकर, बाप्पी मांजरेकर आदी उपस्थित होते.
ना. राणे म्हणाले, हा कार्यक्रम माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. अशा उद्योगाना संपूर्ण सहकार्य करण्याचा सल्ला खा.नारायण राणे यांनी आम्हाला दिले आहे. अशा प्रकल्पामुळे उद्योजक बनण्याची भावना निर्माण होते. नोकरी देणारे हात यातून पुढे येतात. जिल्ह्यात नोकऱ्या निर्माण झाल्या पाहिजेत. उद्योगधंदे कसे येतील यासाठी प्रयत्न केले जातील. येत्या काळात जिल्ह्यात मोठे मोठे उद्योगधंदे येणार आहेत, त्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. रोजगारासाठी गोवा तसेच पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या तरुणांन जिल्ह्यातच रोजगार देण्यासाठी आपण मेहनत घेणार असल्याचे ना. नितेश राणे यांनी सांगितले. जिल्ह्यात सुरू झालेले प्रकल्प टिकले पाहिजेत. यासाठी लागेल ती मदत मी उद्योगाला करणार असा शब्दही ना. राणे यांनी दिला. प्रास्ताविक संतोष प्रभाकर टक्के यांनी केले. आभार संतोष श्रीधर टक्के यांनी मानले.