कुडाळ : पुढारी वृत्तसेवा
सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनात आता एका सुवर्णयुगाची पहाट उजाडत आहे. भारतीय नौदलाची सलग चार दशके दिमाखात सेवा करून निवृत्त झालेली 'आयएनएस गुलदार' (INS Guldar) ही बलाढ्य युद्धनौका आता निवती रॉक जवळील २२ मीटर खोल समुद्रात कायमची विसावणार आहे.
सागरतळाशी साकारल्या जाणाऱ्या या देशातील आणि आशिया खंडातील पहिल्या 'अंडरवॉटर म्युझियम' (पाण्याखालील संग्रहालय) आणि 'आर्टिफिशियल रीफ' (कृत्रिम प्रवाळ मित) प्रकल्पामुळे जागतिक पर्यटन नकाशावर सिंधुदुर्गचा नवा दरारा निर्माण होणार आहे, अशी घोषणा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (MTDC) व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे यांनी केली.
तारकर्ली येथील 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायव्हिंग अँड अॅक्वाटीक स्पोर्ट्स' मध्ये आयोजित विशेष पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, माझगाव शिपयार्डचे नीपेंद्र नीरव, पाणबुडी तज्ज्ञ सुनील कोरटी यांच्यासह एमटीडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शिवधनुष्य पेलले; १०० दिवसांत ऐतिहासिक टप्पे पार..! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाचा १०० दिवसांचा कृती आराखडा जाहीर केला होता. या आराखड्याचा भाग म्हणून पर्यटन विकास महामंडळाने नौदलाकडून 'आयएनएस गुलदार'चा ताबा घेतल्यानंतर अवघ्या १०० दिवसांच्या आत या महाप्रकल्पाची पूर्वतयारी करून दाखवत एकप्रकारे 'शिवधनुष्य' पेलले आहे.
सोमवार १८ मे रोजी या कृत्रिम प्रवाळ भिंत आणि पाणबुडी संग्रहालयाच्या अंतिम टप्प्याचा सोहळा संपन्न होत आहे. या ऐतिहासिक प्रकल्पाचे एकूण ५ टप्पे असून, त्यातील पहिले ३ टप्पे अत्यंत नियोजनबद्ध रीतीने पार पडले आहेत. पहिला टप्पा-नौदलाकडून युद्धनौकेचे 'एमटीडीसी'कडे कायदेशीर हस्तांतरण, दुसरा टप्पा- इंजिन नसलेल्या या महाकाय युद्धनौकेला टग बोर्टीच्या सहाय्याने खेचत विजयदुर्गच्या जेटीवर सुरक्षित आणणे, तिसरा टप्पा-युद्धनौकेच्या पोटात असलेले सर्व पर्यावरणास हानिकारक घटक स्वच्छ करून आवश्यक ते सर्व परवाने मिळवणे.
आता या प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात झाली असून, निवती रॉकच्या समुद्रात २२ मीटर खोलीवर या बोटीचे अत्यंत नियंत्रित पद्धतीने 'स्कटलींग' (समुद्रात बुडवणे) केले जात आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायविंग अँड अॅक्वाटीक स्पोर्ट्स अर्थात इसदा या प्रशिक्षण संस्थेचे सहकारी नाशिक बोट क्लब व्यवस्थापक धीरज चोपडेकर, माजी इसदा व्यवस्थापक सूरज भोसले, विजयदुर्ग MTDC निवास व्यवस्थापक तथा स्कुबा डायमास्टर संकेत गावडे, वरिष्ठ स्कुबा इस्टक्टर जितेश वस्त, घनश्याम मोरजे, आंतोन काळसेकर, थॉमसन फर्नांडिस यांनी या प्रकल्पाच्या कामी मोठी मेहनत घेतली. प्रकल्पाच्या सुरुवातीच्या काळात प्रकल्पाचे संपूर्ण आरेखन एमटीडीसीचे जल पर्यटन सल्लागार डॉ. सारंग कुलकर्णी यांनी पाहिले होते, असे श्री गटणे यांनी सांगितले.
नैसर्गिक अधिवासाचे रक्षण आणि रोजगार !
वाढत्या पर्यटनामुळे समुद्रातील नैसर्गिक अधिवासावर मोठा ताण येत आहे. त्याला उत्तम पर्याय म्हणून हा कृत्रिम रीफ (आर्टिफिशियल रीफ) प्रकल्प सागरी जैवविविधतेला नवी दिशा देईल. यातून स्थानिक भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण व्हावा, हेच शासनाचे मुख्य व्हिजन असून जिल्हा प्रशासन या संपूर्ण प्रकल्पावर बारीक लक्ष ठेवून आहे, असे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले.
सागरी पर्यटनाचा कायापालट; काय असणार वैशिष्ट्ये ?
२४ आसनी अद्यावत पाणबुडी या रोमांचकारी सफारीसाठी माझगाव डॉक मध्ये अत्याधुनिक २४ आसनी पाणबुडी तयार केली जात आहे. पुढील दीड ते दोन वर्षांत ही पाणबुडी पर्यटकांच्या सेवेसाठी सिंधुदुर्गात सज्ज होईल. अद्भुत सागरी अधिवास- समुद्रतळाशी सामावलेली ही युद्धनौका स्वतःभोवती प्रवाळ, समुद्री गवत, रंगीबेरंगी मासे आणि सागरी जैवविविधतेने नटलेला एक नवा स्वर्ग निर्माण करेल. तरंगते रेस्टॉरेट-निवती रॉक्सजवळ पर्यटकांसाठी एक भव्य तरंगता बार्ज स्थापित केला जाईल. तिथे पर्यटकांना बसण्यासाठी उत्तम व्यवस्था आणि रेस्टॉरंटची सुविधा असेल.
स्पीड बोटींचा थरार तारकर्ली येथील स्कुबा डायव्हिंग सेंटरवरून दोन आधुनिक स्पीड बोटींद्वारे पर्यटकांना थेट या प्रकल्पाच्या ठिकाणी नेण्यात येईल. तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनाग्राफी आणि कोस्टल झोन मॅनेजमेंट अॅथॉरिटी यांच्या मार्गद र्शनाखाली या प्रकल्पाची संपूर्ण रूपरेषा आखण्यात आली आहे. लवकरच पर्यटन विभाग 'क्लस्टर मॅनेजमेंट युनिट' आणि 'डिस्ट्रिक्ट मॅनेजमेंट युनिट' च्या माध्यमातून स्थानिक पर्यटनाला नवी गती देणार असून, या संपूर्ण संकल्पनेचा 'पायलट प्रोजेक्ट' सिंधुदुर्गातून राबविला जात असल्याची माहिती निलेश गटणे यांनी शेवटी दिली.