मडुरा : रोणापाल-देऊळवाडी येथील रहिवासी सचिन कुबल यांच्या राहत्या घरी रविवारी दुपारी इंडियन कोब्रा (भारतीय नाग) पकडण्यात आला. भक्षाच्या शोधात घरात घुसलेल्या तीन फुटी कोब्राला वेंगुर्ले तालुक्यातील तुळस येथील सर्पमित्र महेश राऊळ यांनी पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.
रोणापाल-देऊळवाडी येथील सचिन कुबल यांच्या पत्नी आरती कुबल यांना घराच्या छप्परात लांबून साप असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याची कल्पना सर्वांना दिल्यानंतर तुळस येथील सर्पमित्र महेश राऊळ यांना बोलवण्यात आले.
मोठ्या शिताफीने राऊळ यांनी इंडियन कोब्राला (भारतीय नाग) पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. पकडलेल्या इंडियन कोब्राला पाहण्यासाठी देऊळवाडीतील लोकांनी गर्दी केली होती. सुदिन गावडे व मंगेश गावडे यांनी सर्पमित्र महेश राऊळ यांचे आभार मानले.