आचरा: संस्थानकालीन आचरे येथील इनामदार श्री देव रामेश्वर तरंगाच्या स्वारीसह छत्र चामरे, अब्दागिर, निशाण, महालदार, चोपदार, मानकरी आदीसह हजारो भाविकांच्या साक्षीने संस्थांनी आब राखत आचऱ्याचा राजाची तब्ब्ल ३९ वर्षांनी श्री क्षेत्र कुणकेश्वर ' यांची महास्थळास' जात शाहीभेट 'श्रीं'च्या हुकमाने झाली. महाशिवरात्री निमित्ताने 'श्रीं' ची स्वारी आपल्या पूर्वपार पारंपरिक मार्गाने मार्गक्रमण करत उशिरा रात्री कुणकेश्वर येथे पोहोचली. (Mahashivratri 2025)
या उत्सवास आज (दि.२६) सकाळी शाही थाटात प्रारंभ झाला. मृदुंगाची थाप, सनई, ढोल, ताशा आणि तुतारीच्या मंजूळ स्वरांनी मंदिर व परिसराचे वातावरण भक्तीमय बनले होते. महालदारांची ललकारी होताच नगारखन्यातील चौघडयांच्या निनादातच तोफाही धडाडल्या. आसमंतात बंदूकांच्या फैरी झडल्या. श्री देव रामेश्वराची एतिहासिक स्वारी शाही संस्थानी थाटात क्षेत्र कुणकेश्वर महास्थळास जाण्यासाठी आपल्या शाही लवाजम्यासह बाहेर पडली. सर्वत्र श्री देव रामेश्वराच्या स्वागतासाठी ग्रामस्थांनी रस्त्यावर सडा समार्जन करून जागोजागी पताका, रंगेबेरंगी गुढ्या, तोरणे, चलचित्र देखावे उभारले होते.
श्री देव रामेश्वराच्या देवस्वारीने आपल्या रयतेसह घेतलेली भेट सुवर्ण क्षणांनी उजळून निघाली. आचरा येथील श्री देव रामेश्वर मंदिराकडून सकाळी १०.३० च्या सुमारास निघालेली देव स्वारी कुणकेश्वर येथे रात्री ११ च्या सुमारास पोहोचेल. देव स्वारीचा सुवर्ण भेटीचा तब्ब्ल १४ तासांचा पारंपरिक मार्गाने झालेला हा प्रवास हजारो भाविकांचा आनंद द्विगुणित करणारा ठरला. गुरुवारी (दि.२७) दुपारी श्री देव रामेश्वर आपल्या शाही लवाजम्यासह भक्तांच्या गाठीभेटी सुख, दु:खे जाणून घेत २८ फेब्रुवारीला पहाटे श्री देव रामेश्वर मंदिरात परतल्यानंतर या उत्सवाची सांगता होणार आहे.
बुधवारी सकाळी मंदिरातून बाहेर पडल्यानंतर सकाळी पास्थळामधील देवदेवतांच्या भेटी घेऊन श्री देव रामेश्वराची स्वारी श्री देव गांगेश्वर मंदिराजवळून निघाली. श्री गणपती मंदिराकडून पारवाडी येथील श्री ब्राम्हणदेव मंदिराकडून आचरा पारवाडी येथील नदी किनारी दाखल झाली. नदीतून होडीच्या सहाय्याने मुणगे करिवणे येथे दाखल झाली.
ठीक ठिकाणी रस्त्यावर शेणाने सारवण करून सडा रांगोळी काढून धूप धीप लावून गुढ्या तोरणे उभारून प्रत्येक भाविक 'श्री' च्या स्वागतासाठी सूर्याच्या रखरखीत उन्हातही हजारोंच्या संख्येने या सोहळ्यात भाविक सामील झाले होते.मशवी येथे भाविकांसाठी मशवी गावातील ग्रामस्थां कडून अल्पोपहार ची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच हिंदळे येथे ग्रामस्थांकडून शीतपेयांचे वाटप करण्यात आले.आचरा, हिंदळे, मशवी, कातवण येथील ग्रामस्थांनी श्री ची स्वारी ज्या ज्या मार्गाने मार्गस्थ झाली, तो मार्ग झाडून स्वच्छ केला होता.
भर दुपारी मुणगे, करिवणे घाटी चढून मशवी येथील माळरानावरून मुणगे, बांधाची कोडं हिंदळे, मिठाबां व येथे सायंकाळी दाखल झाली. तिथे काही वेळ विश्रांती करून 'श्री' ची स्वारी पुन्हा मार्गस्थ झाली. श्री देव गोरक्ष गणपती येथून कातवणे येथे रात्री पोहोचल्यावर थोडा वेळ विश्रांती करून 'श्री' ची स्वारी पुन्हा मार्गस्थ झाली. कातवण येथील ग्रामस्थांकडून खाडी पात्रात १ हजार वाळूच्या गोण्या भरून सेतू तयार करण्यात आला होता.
कातवणे कुणकेश्वर येथील समुद्रकिनारी असलेल्या मारुती मंदिराकडून झुलावा नृत्य करत क्षेत्र श्री कुणकेश्वर वर येथे श्री ची स्वारी दाखल झाली. कुणकेश्वर मंदिराला तीन प्रदक्षिणा केल्यानंतर आपला भाऊ असलेल्या श्री देव कुणकेश्वर ची भेट घेतली. हा तब्ब्ल ३९ वर्षा नंतर चा सोहळा 'याची देही, याची डोळा 'अनुभवण्या साठी लाखोंच्या संख्येने भाविक श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात दाखल झाले होते. 'श्री' च्या स्वारीत सांगली, सातारा, कराड, पंढरपूर, फलटण, बारामती येथून बँड पथक दाखल झाले होते.