कुणकेश्वर तीर्थस्थानी लोटला भाविकांचा जनसागर!

Mahashivratri 2025 : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विषेश उपस्‍थिती, दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी
Mahashivratri 2025
महाशिवरात्रीनिमित्त कुणेकेश्वराची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुजा केली. यावेळी उपस्‍थित आमदार निलेश राणे.Pudhari Photo
Published on
Updated on

देवगड : हर हर महादेवाच्या जयघोषात, ओम नम: शिवाय च्या नामजपात व श्री देव कुणकेश्वरचा नामघोषात महाशिवरात्रौत्सवामध्ये कुणकेश्वर तीर्थस्थानी भाविकांचा जनसागर लोटला होता. यात्रेच्या पहिल्याच दिवशी भाविकांच्या गर्दीने उच्चांक गाठला होता. गुरूवारी दर्श अमावास्येची पर्वणी असून यादिवशी पवित्र तिर्थस्नानाने यात्रेची सांगता होणार आहे.

श्रीदेव कुणकेश्वरची शासकीय पूजा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आली. यानंतर दर्शनाला सुरूवात झाली. उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, देवगड तहसिलदार आर.जे.पवार यांनी पहाटे दर्शन घेतले. पहाटेपासून दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होती. दिवसभरात अनेक मान्यवर मंडळी तसेच राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी दर्शन घेतले. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, सौ.निलमताई राणे, पालकमंत्री ना.नितेश राणे, आमदार निलेश राणे, आ.किरण उर्फ भैय्या सामंत, रविंद्र फाटक, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर, अमोल लोके, गटविकास अधिकारी वृक्षाली यादव आदींनी दर्शन घेतले. देवस्थान ट्रस्‍ट व ग्रामपंचायतीच्यावतीने लोकप्रतिनिधी, महनीय व्यक्तिंचा सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थान ट्रस्‍टचे अध्यक्ष एकनाथ तेली, सरपंच महेश ताम्हणकर आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावर्षी दोनच दिवसांची यात्रा असल्याने सकाळपासूनच दर्शनासाठी अलोट गर्दी होती. यात्रेत प्रथमच विक्रमी १० देवस्वाऱ्या कुणकेश्वर भेटीसाठी आल्या यामध्ये मिठबांव श्रीदेव रामेश्वर देवस्वारी ३०० वर्षांनी कुणकेश्वर भेटीसाठी तर श्री इनामदार रामेश्वर संस्थान आचरा श्री देव रामेश्वराची देवस्वारी ३९ वर्षांनी, शिरगाव श्री देवी पावणाईदेवी २२ वर्षांनी व देवगड जामसंडे गावचे ग्रामदैवत श्री दिर्बा रामेश्वर देवस्वारी १२ वर्षांनी कुणकेश्वर भेटीसाठी आले. याशिवाय श्री देव माधवगिरी माईन कणकवली, श्री गांगेश्वर नारींग्रे, श्री देव जैनलिंग रवळनाथ महालक्ष्मी पावणादेवी गांगो बिडवाडी कणकवली, श्री देव गांगेश्वर बावशी बेळणे कणकवली, श्री पावणादेवी हुंबरठ कणकवली, श्री गांगेश्वर पावणाई भावई दाभोळे या देवस्वाऱ्या कुणकेश्वर भेटीला आल्या होत्या.

रस्त्याच्या दुतर्फा विविध प्रकारची मिठाई, हॉटेल्स, मालवणी खाजा, कापड दुकाने, चायना खेळणी यांनी यात्रा परिसर फुलुन गेला होता. या वेळी यात्रेच्या ठिकाणी पारंपारिक शेतीअवजारे मोठ्या प्रमाणात विक्रीस आली होती. मंदिर परिसर व यात्रेमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. देवस्थान ट्रस्‍ट व सेवा मंडळ यांनी खास रांगांची व्यवस्था करण्यात आली होती.

सागरी सुरक्षेच्या दृष्टिने लाइफ जॅकेट धारक पोलीस व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, कर्मचारी सतर्कतेने काम करत होते. तसेच ग्रामस्थांचे भरारी पथक देखील समुद्रस्नान करणाऱ्या भाविकांवर लक्ष देऊन आहेत. एसटी प्रशासनामार्फत भाविक प्रवाशांच्या सोयीसाठी प्रत्येक मार्गावर एसटी गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या. ग्रामपंचायत कुणकेश्वर व देवस्थान ट्रस्‍ट व ग्रामस्थ यांनी नेटके नियोजन केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news