कणकवली-नरडवे रस्त्यावर वादळी वार्‍याने उडून पडलेले इमारतीचे मोठे छप्पर Pudhari Photo
सिंधुदुर्ग

कणकवलीत सातव्या मजल्यावरील पत्र्याचे छप्पर थेट रस्त्यावर कोसळले

नरडवे चौकात वादळी वार्‍याने दुर्घटना : सुदैवानेच जीवितहानी टळली

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : पुढारी वृत्तसेवा

कणकवली शहरासह तालुक्यात बुधवारी सकाळी झालेल्या वादळी पावसाने ठिकठिकाणी झाडे पडून पडझड झाली, तर कणकवली शहरात सकाळी 10.45 वा.च्या सुमारास पावसाबरोबरच आलेल्या सोसाट्याच्या वार्‍याने येथील श्रीधर नाईक चौकानजीक काम सुरू असलेल्या सात मजली इमारतीवरील पत्र्यांचे छप्पर लोखंडी अँगलसह सुमारे 100 ते 150 फुटांवर उडून उपजिल्हा रुग्णालयाच्या कंपाऊंड वॉलजवळ भर वर्दळीच्या कणकवली-नरडवे मार्गावर पडले. सुदैवानेे जीवितहानी टळली. सुमारे 40 फूट लांब आणि 25फूट रुंद असलेले हे मोठे छप्पर गॅस कटरने कापून सुमारे 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर क्रेनने हटवत मार्ग मोकळा करण्यात आला.

  • उर्वरित छप्पर हटविण्याची विकासकाला नोटीस

  • सर्वच इमारतींच्या छपरांचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट

  • नगर पंचायत अ‍ॅक्शन मोडवर

  • प्रशासकीय यंत्रणाही अलर्ट

न. पं. मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित इमारतीच्या विकासकाला इमारतीवरील उर्वरित लोखंडी छप्पर तातडीने काढून टाकण्याची नोटीस बजावली आहे तर शहरातील सर्वच इमारतींवरील अशा छपरांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबाबतही संबंधितांना नोटिसा बजावणार असल्याचे श्री. कंकाळ यांनी सांगितले. बुधवारी सकाळी 10.45 वा.च्या सुमारास जोरदार वादळी पाऊस झाला त्यावेळी रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी होती. याच दरम्यान वार्‍याचा वेग वाढून अचानकपणे मोठा आवाज झाला आणि श्रीधर नाईक चौकातील काम सुरू असलेल्या एका सात मजली इमारतीवरील पत्र्यांचे छप्पर लोखंडी अँगलसह वार्‍याने सुमारे 100 फुटावर उडून कणकवली-नरडवे मार्गावर उपजिल्हा रुग्णालयाच्या भिंतीजवळील स्ट्रीट लाईटच्या दोन पोलवर धडकून थेट रस्त्यावरच कोसळले आणि सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला.

छपराचा एक पत्रा दोन रिक्षा उभ्या असलेल्या मधील भागात पडला. सुदैवाने रिक्षांचे नुकसान झाले नाही. छप्पर रस्त्यावर मधोमध असलेल्या स्ट्रीट लाईटच्या दोन पोलांवर पडल्याने त्या पोलावरील विद्युत तारा रस्त्यावर तुटून पडल्या होत्या. महावितरण कर्मचार्‍यांनी तत्काळ धाव घेत सुरक्षिततेच्या दृष्टीने तेथील वीज पुरवठा बंद करण्यात आला.प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता विलास बगडे, कणकवली पोलिस ठाण्याचे वाहतूक पोलिस विनोद चव्हाण, नगरपंचायतचे कर्मचारी किशोर धुमाळे, यांच्यासह अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होत घटनेची माहिती घेतली. रस्त्याच्या एका लेनवर ते छप्पर पडल्याने त्या लेनवरील वाहतूक दुसर्‍या लेनवरून सुरू असल्याने वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिस विनोद चव्हाण यांनी वाहतूक कोंडी सुरळीत केली. क्रेनच्या साहाय्याने हे छप्पर उचलून कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर ठेवण्यात आले. रस्ता वाहतुकीस सुरळीत करण्यासाठी सुमारे साडेतीन ते चार तास लागले.

दरम्यान, या दुर्घटनेमुळे शहरातील सर्वच इमारतींवरील छपरांच्या सुरक्षेचा ऐरणीवर आला आहे. बर्‍याचदा मोठमोठ्या उंच इमारती बांधल्या जातात आणि त्यावर गळती लागू नये म्हणून लोखंडी अँगल टाकून पत्र्यांचे छप्पर टाकले जाते मात्र, अशा वादळी वार्‍यात ही छपरे उडून जाण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT