मालवण : कुडाळ नंतर मालवण तालुक्यात अनधिकृत वाळू वाहतूक करणार्या डंपरवर प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्या आदेशाने शनिवारी सायंकाळी उशिरा महसूल व आचरा पोलिस यांनी संयुक्तपणे कारवाई केली. या कारवाईत गोवा पासिंगचे दोन व महाराष्ट्र पासिंग एक असे तीन डंपर ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेले तिन्ही डंपर मसुरे दूरक्षेत्र आवारात लावण्यात आले आहेत.या कारवाईमुळे मालवण तालुक्यातील अनधिकृत वाळू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
कुडाळ प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांना मालवण तालुक्यातील अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतूक बाबत माहिती मिळाली होती,त्या पार्श्वभूमीवर त्यांनी महसूल यंत्रणेला कारवाईचे आदेश दिले, त्यानुसार आचरा पोलिसांना सोबत घेत महसुल यंत्रणेने मालवण- मळावाडी वाळू पट्यात शनिवारी धडक कारवाई केली. या कारवाई दरम्यान मळावाडी येथील वाळू उत्खनन रॅम्पवर मंदार खडपकर व संदीप रामू फटकारे अशा दोन मालकांच्या नावे असलेले तीन डंपर आढळून आले.
कारवाई दरम्यान डंपर चालकांनी पळ काढल्याने ते पोलिसांच्या हाती लागू शकले नाहीत, असे महसुलच्या अधिकार्यांनी सांगितले. मालवण मधील या धडक कारवाईमुळे अनधिकृत वाळू व्यावसायिक धास्तावले आहेत. शनिवारी रात्री उशिरा मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याकडुन आचरा प़ोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. आचरा पोलिस उपनिरीक्षक प्रदीप पवार,मसुरे मंडळ अधिकारी दीपक शिंगरे,मसुरे महसुल सेवक सचिन चव्हाण ,ग्राम महसुल अधिकारी भागवत जाधव, दत्तात्रय खुळपे, पोलीस पाटील नरेश मसुरकर यांच्या पथाकने ही कारवाई केली, अशी माहिती कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयाचे नायब तहसिलदार श्री.शिदे यांनी दिली.