Dodamarg Farmers Protes  
सिंधुदुर्ग

Dodamarg Farmers Protes | महसूलमंत्र्यांनी कारवाईचे आदेश देऊनही, सासोलीत वृक्षतोड व अवैध उत्खनन सुरूच!

Dodamarg Farmers Protes | परप्रांतीय धनदांडग्यांची मुजोरी कायम ; प्रशासन गांधारीच्या भूमिकेत

पुढारी वृत्तसेवा

दोडामार्ग : पुढारी वृत्तसेवा

महसूल मंत्र्यांनी अधिवेशनात स्पष्टपणे कारवाईचे आदेश दिल्यानंतरही सासोली येथील सामायिक जमिनीत परप्रांतीय धनदांडग्यांची मुजोरी कायम आहे. स्थानिकांच्या जमिनीत या परप्रांतीयांकडून बेसुमार वृक्षतोड व अवैध उत्खनन सुरू असून प्रशासन मात्र गांधारीच्या भूमिकेत आहे.

त्यामुळे मंत्र्यांच्या सूचनांकडेच दुर्लक्ष करून संबंधितांवर कारवाई टाळली जात असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे. सासोली येथे परप्रांतीय धनदांडग्यांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी पावसाळी अधिवेशनात केला होता.

या प्रकरणात स्थानिक प्रशासनानेही परप्रांतीयांना साथ दिल्याचा आरोप करत त्यांनी चौकशी व कठोर कारवाईची मागणी केली होती. या आरोपाला उत्तर देताना महसूल मंत्री बावनकुळे यांनी अधिवेशनातच चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन दिले होते.

मात्र प्रत्यक्षात या आश्वासनानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. उलट, परप्रांतीय धनदांडग्यांची मुजोरी अधिकच वाढल्याचे चित्र असून मोठमोठी मशिनरी लावून बेसुमार वृक्षतोड आणि अवैध उत्खनन सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत असतानाही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. रविवारी सकाळी ग्रामस्थांनी हा प्रकार हाणून पाडत कामकाज थांबवले व याची माहिती संबंधित प्रशासनाला दिली. तरीही कारवाईचा अभाव कायम असल्याने प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळणार का?

अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडूनही आणि खुद्द महसूल मंत्र्यांनी स्पष्ट निर्देश दिल्यानंतरही अधिकाऱ्यांची कारवाई अद्याप गुलदस्त्यातच असल्याने, काही अधिकारी जाणीवपूर्वक या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत आहेत का? असा थेट सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

आम्हाला स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळणार का? की हे प्रकरणही दडपले जाणार? असे सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केले आहेत. त्यामुळे वरिष्ठ हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतात? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT