देवगड : कारवाईसाठी आणलेली राजाधगिरी ही परप्रांतीय नौका.  Pudhari Photo
सिंधुदुर्ग

Sindhudurg Illegal Fishing News |बेकायदा मासेमारी करणारी कर्नाटकी नौका जेरबंद

मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाची आचरा समुद्रात कारवाई

पुढारी वृत्तसेवा

देवगड: महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत आचरा बंदर परिसरात 14 वाव खोल समुद्रात बेकायदा मासेमारी करणार्‍या कर्नाटक राज्यातील ‘राजाधगिरी’ या नौकेला देवगड मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाने पकडले. या नौकेवर तांडेलासह एकूण 7 खलाशी होते. ही नौका ताब्यात घेऊन देवगड बंदरात आणण्यात आली आहे. ही कारवाई 25 नोव्हेंबर रोजी पहाटे 3.45 च्या सुमारास करण्यात आली.

महाराष्ट्र सागरी मत्स्य व्यवसाय क्षेत्राचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या द़ृष्टीने मत्स्य व्यवसाय विभाग सतत सजग असून परप्रांतीय नौकांमार्फत होणार्‍या अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलत आहे. याच धोरणांतर्गत मंगळवारी पहाटे आचरा सागरी हद्दीत सुमारे 14 वाव खोल समुद्रात मत्स्य व्यवसाय विभागाच्या नियमित गस्तीदरम्यान बेकायदा मासेमारी करणार्‍या कर्नाटक राज्याच्या राजाधगिरी (खछऊ-घअ-02-चच-4523) या नौकेवर यशस्वी कारवाई करण्यात आली.

ही नौका कर्नाटक राज्यातील दिवाकर के. कलमाडी (रा.उडपी) यांच्या मालकीची असून या नौकेचा परवाना फक्त कर्नाटक राज्याच्या जलक्षेत्रासाठी वैध आहे. न्यायालयीन सुनावणीनंतर नौकामालक व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. ही कारवाई सिंधुदुर्ग मत्स्य व्यवसाय विभागाचे सहा. आयुक्त सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली व देवगडचे सहा. मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी किरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली देवगड पोलिस कर्मचारी श्री. फरांदे, सागरी सुरक्षा पर्यवेक्षक श्री. टुकरुल, श्री. खवले, श्री. फाटक, श्री. बांधकर, श्री. कुबल, श्री. सावजी यांच्या पथकाने केली. देवगड तालुक्याच्या समुद्रात गेल्या 15 दिवसांत परप्रांतीय नौकेवर झालेली दुसरी मोठी कारवाई आहे.

नौकेवर तांडेलसह एकूण सात खलाशी

नौकेवर तांडेलसह एकूण 7 खलाशी होते. मत्स्य व्यवसाय विभागाच्या पथकाने ही नौका ताब्यात घेत देवगड बंदरात आणली. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 तसेच सुधारित अधिनियम 2021 च्या तरतुदींनुसार या नौकेवर कारवाई करण्यात आली आहे. या नौकेवर आढळून आलेल्या मासळीची लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली असून प्रकरणाचा सविस्तर अहवाल सहा. आयुक्त- मत्स्य व्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT