

कणकवली ः गेले चार-सहा महिन्यात तीन वेळा मुदत वाढ देऊन सुद्धा माहिती भरल्यानंतर, स्वतःच्या शेतात उभे राहिल्यावर एरर दाखवून, तुमचे सर्वे नंबर प्रमाणे क्षेत्र चार-पाच कि.मी.वर असल्याचा मेसेज येतो. त्यामुळे बागायतदार व शेतकऱ्यांचे अद्यापही पुनर्रचित हवामानावर आधारित ई पिक होत नाही. 30 नोव्हेंबर शेवटची तारीख असल्याने, बागायतदार व शेतकरी हतबल झाला असून, तीव्र संताप व्यक्त होत आहे. यासाठी येणाऱ्या अडचणीमुळे गेल्या वर्षीप्रमाणे ई-पीक करून देऊन चालू वर्षी ई-पीक पाहणी अट शिथिल करावी व शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी आग्रही मागणी बागायतदार व शेतकऱ्यांकडून होत आहे.
याबाबत पालकमंत्री व जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग पणन खाते यांनी गांभीर्याने लक्ष देऊन मुदतीपूर्वी संबंधितांना आदेश निर्गमित करावे व दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नुकतेच जिल्हाधिकारी यांनी पुनर्रचित हवामानावर आधारित विविध योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी ई-पीक पाहणी अनिवार्य असल्याचे कळविले आहे. ई-पीक पाहणी अट शिथिल करणे बाबत बागायतदार, शेतकरी, विविध सोसायटीज, बँका, यांचेकडून ई-पीक ॲपवरून एरर येत असल्याने, अट शिथिल करण्याची मागणी केली आहे. पालकमंत्री यांनी ही अट जुन्या ई-पीक केलेल्या साठी शिथिल करावी, याबाबत संबंधितांना विनंती केली आहे. वेळोवेळी या योजनेबद्दल जिल्हास्तरीय सभा, कृषी अधिकाऱ्यांची निवेदने, देवगड - फोंडाघाट विकास सोसायटी यांचे कडील पत्राद्वारे कृषी जिल्हा कृषी अधिकारी यांनी ई-पीक स्थगितीची मागणी केली आहे आणि कृषी आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांना आग्रही मागणीचे गांभीर्य कळविले आहे. मात्र, सुशेगात अधिकाऱ्यांनी तीन वेळा मुदतवाढ करूनही एरर वर ठोस निर्णय घेतलेला नाही.