बांदा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बांदा पोलिसांनी मंगळवारी सकाळी 7.30 वा. च्या सुमारास गुरांची बेकायदेशीर वाहतूक करणारा टेम्पो पकडला. या कारवाईत दोन मोठे बैल, एक लहान पाडा आणि टेम्पो असा मिळून सुमारे 2 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
निगुडे येथून मडगावकडे कत्तलीसाठी गुरे नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर बांदा येथील सारस चहा टपरीजवळ नाकाबंदी करण्यात आली.दरम्यान तेथे आलेला टाटा इंट्रा मिनी टेम्पो थांबवून तपासणी केली असता आत गुरे दाटीवाटीने भरलेली आढळली. गाडीत चारा किंवा पाण्याची कोणतीही सोय नव्हती. सतवाजी आवडो लंगोटी (रा. फातोर्डा-मडगाव, दक्षिण गोवा), गॉडफ्री फ्रेशर डिसिल्वा (रा. आगासिम-वेल्ला, उत्तर गोवा), फ्रेशर डिसिल्वा (रा. मडगाव, दक्षिण गोवा), दत्ता आणि वैभव अशी संशयितांची नावे असून त्यांच्यावर भारतीय दंड संहिता, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम तसेच मोटार वाहन कायदा या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कारवाईदरम्यान परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते; मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. आरोपींना अटक करून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या वेळी केलेल्या तत्पर कारवाईचे कौतुक केले असून, गुरांची चोरी व बेकायदेशीर वाहतूक थांबवली नाही तर ग्रामीण भागात तणाव वाढतो, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.