देवगड : दोडामार्ग तालुक्यातील झरेबांबर-काजूळवाडी येथे सार्वजनिक बोअरवेल वर भरदिवसा पत्नीच्या पोटावर आणि डोक्यावर वार करुन तिचा खून केल्याच्या आरोपातून पती ज्ञानेश्वर देवू पेडणेकर याची जिल्हा सत्र न्यायाधीश एच. बी. गायकवाड यांनी निर्दोष मुक्तता केली. याकामी संशयित आरोपीतर्फे अॅड. कौस्तुभ मराठे यांनी युक्तिवाद केला.
दोडामार्ग-झरेबांबर काजूळवाडी येथील सार्व. बोअरवेलवर ज्ञानेश्वर पेडणेकर याने 5 ऑगस्ट 2019 रोजी स. 8.30 वा. च्या सुमारास पत्नीच्या पोटावर आणि डोक्यावर चाकूने एकूण 4 वार करुन तिचा निर्घृण खून केला होता. खुनानंतर घटनास्थळावरुन पलायन करताना ज्ञानेश्वर पेडणेकर याला वाडीतील लोकांनी हत्यारासह पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. याप्रकरणी पती पेडणेकर याचेविरुध्द त्याच्या मुलाने खुनाची फिर्याद दोडामार्ग पोलिस स्टेशनमध्ये दिली होती. जिल्हा सत्र न्यायालयात ज्ञानेश्वर पेडणेकर यांच्या विरोधात भा.दं.वि. कलम 302, शस्त्र अधिनियम कलम 4, 25 अंतर्गत खूनाचा खटला मागील 7 वर्षे सुरु होता.
सरकार पक्षाने एकूण 8 साक्षीदार तपासले होते. ज्यामध्ये प्रत्यक्षदर्शी व खुनानंतर आरोपीला पकडणारे साक्षीदार सामील होते. दरम्यान साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती, वैद्यकीय पुराव्यातील तफावती, उद्देश शाबित न होणे या सर्व बाबी आरोपीचे वकीलांनी न्यायालयासमोर मांडल्या होत्या. आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त केले आहे.