Rain Water Around Houses In Malvan
वायरी: येथे घरांभोंवती साचलेल्या पाण्याची पाहाणी करताना तहसीलदार वर्षा झालटे. Pudhari Photo
सिंधुदुर्ग

वायरी -भूतनाथ तेलीवाडीत घरांना पाण्याचा वेढा

पुढारी वृत्तसेवा

मालवण ः पुढारी वृत्तसेवा

मालवणात संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत बनले आहे. अनेक ठिकाणी पडझड तसेच पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत. तालुक्यातील वायरी -भूतनाथ तेलीवाडी येथे मोठया प्रमाणात पाणी साचले असून अनेक घरांना पाण्याने वेढा दिला आहे. घरांमध्ये पाणी शिरण्याची भीती आहे.

दरम्यान, तहसीलदार वर्षा झालटे यांनी त्या ठिकाणी भेट देऊन पाहाणी केली. साचलेल्या पाण्यात उतरून तहसीलदारांनी परीस्थितीचा आढावा घेतला. पाण्याचा निचरा होणेबाबत ग्रामपंचायत प्रशासनास योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना ग्रामसेवक यांना दिल्या आहेत. तसेच पाण्याने वेढा दिलेल्या घरातील नागरिकांना आवश्यक ते सहकार्य व मदत करणेबाबत तलाठी, महसूल प्रशासनास सांगितल्याचे तहसीलदार वर्षा झालटे म्हणाल्या. नायब तहसीलदार श्रद्धा चौगुले उपस्थित होत्या.

पावसाचे पाणी समुद्राला जाण्याचे पारंपारिक मार्ग बंद झाल्यामुळे या भागात पाणी साठत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पाण्याचा निचरा होण्यासाठी गटाराची व्यवस्था करावी, अशी येथील ग्रामस्थांनी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. याबाबत ग्रामपंचायती जवळ अनेकदा पाठपुरावा करूनही परिस्थिती जैसे थे असल्याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. पावसाचे पाणी समुद्राला जाण्याचा पारंपारिक मार्ग दगडी बांधकाम करून ज्या कुंपणात बंद झाला आहे तो तहसीलदार यांना दाखवण्यात आला. ग्रामस्थांनी मदत करत पाणी जाण्याचा मार्ग काही प्रमाणात मोकळा केला. मात्र पूर्ण मार्ग खुला करणे गरजेचे असल्याचे उपस्थितानी सांगितले.

सतत पाणी साठल्यामुळे झाडे उन्मळून पडत आहेत. तेलीवाडी येथे काही ठिकाणी माड कोसळल्यामुळे येथील काही घरांचे नुकसान झाले आहे. वीज वाहिन्याही तुटून पडल्या होत्या. घरांभोवती सततचे पाणी साठून राहिल्यामुळे त्यात शौचालयातील दूषित पाणी मिसळण्याची व परिसरात रोगराई पसरण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. कोसळणार्‍या पावसातच पाणी साचलेल्या संपूर्ण परिसराची पाहाणी करत तहसीलदारांनी ग्रामस्थांच्या भावना जाणून घेतल्या.तलाठी वसंत राठोड, ग्रामसेवक दयानंद कांबळे, ग्रा. पं. सदस्य पांडुरंग मायानक, उपसरपंच प्राची माणगावकर, देवानंद लोकेगावकर, केदार झाड, दादा वेंगुर्लेकर, दर्शन वेंगुर्लेकर, शाम झाड, आनंद बांबार्डेकर, भाऊ तळवडेकर, अभय पाटकर, राजाराम माडये, प्रथमेश डिचोलकर, सिद्धेश केळुस्कर, हर्षद तळवडेकर, प्रकाश गोलतकर यांसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

घरावर कोसळला वटवृक्ष

शिवाजी महाराज पुतळ्या समोरील प्रदीप वेंगुर्लेकर यांच्या घराच्या बाजूला असलेले भले मोठे वडाचे झाड सोमवारी पहाटे कोसळले. यामुळे घराच्या छप्पराचे नुकसान झाले, मात्र सुदैवाने वेंगुर्लेकर कुटुंबीय बचावले. याठिकाणीही तहसीलदार यांनी पाहाणी करून नुकसानीचा आढावा घेत कुटुंबियांची विचारपूस केली. वायरी -भूतनाथ मंदिर जवळील रस्त्यावर सोमवारी सकाळी आंब्याचे झाड कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. ग्रामस्थांच्या मदतीने कोसळलेले आंब्याचे झाड तोडून मार्ग मोकळा करण्यात आला.

SCROLL FOR NEXT