कुडाळ : कुडाळ शहरातील श्रीरामवाडी येथे सोमवारी रात्री 8 च्या सुमारास घराला अचानक आग लागली. या घटनेत घराच्या छप्परासह कपाट, टीव्ही, फ्रिज व अन्य गृहोपयोगी साहित्य जळून सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले. नागरिकांनी धाव घेत आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. प्रसंगावधान दाखवत घरातील गॅस सिलिंडर तातडीने बाहेर काढल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही.
मुंबई-गोवा महामार्गावरील हॉटेल पॅलेस नजीक चाळवजा घर आहे. यातील एका रूममध्ये अमोल निकम यांचे कुटुंबीय भाड्याने राहतात. सोमवारी सायंकाळी निकम कुटुंबीय बाजारात गेले होते. दरम्यान, त्यांच्या रूममधून धूर येऊ लागल्याचे शेजारील नागरिकांच्या निदर्शनास आले. अचानक घरातून धूर निघताना दिसल्याने शेजार्यांनी सतर्कता दाखवत निकम यांना फोन करून ही माहिती दिली.
निकम यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि शेजार्यांच्या मदतीने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. नागरिकांच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आली आणि पुढील मोठे नुकसान टळले. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या आगीत अमोल निकम यांचे आर्थिक नुकसान झाले असून, स्थानिकांनी त्यांना मदतीचा हात दिला. घटनेची माहिती मिळताच नगरसेविका चांदणी कांबळी, नगरसेवक अभी गावडे, चंदन कांबळी, सचिन काळप यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. नागरिकांनी वेळीच धाव घेत विहिरीच्या पाण्याच्या सहायाने आगीवर नियंत्रण मिळविले. ऐन दिवाळी दिवशीच ही घटना घडल्याने निकम कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.