

कुडाळ : स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कुडाळ - बाजारपेठ येथील एका पानटपरीवर छापा टाकून सुमारे 2 लाख 88 हजार 660 रु. किमतीचा अवैध गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. ही कारवाई शनिवारी सायंकाळी करण्यात आली.
याप्रकरणी चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील तीनजणांना अटक करण्यात आली. अवैध गुटखा व तंबाखूजन्य अन्य पदार्थ बाळगल्याप्रकरणी कुडाळ शहरातील महिनाभरात झालेली ही तिसरी कारवाई आहे. या प्रकरणातील संशयित इमरान शमसुद्दीन करोल (वय 42), इम्तियाज शमसुद्दीन करोल (44) व आरिफ महंमद शरीफ करोल (38, तिघेही रा. कुडाळ- करोलवाडी) या तिघांना अटक केली.
रविवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. यातील आणखी एक संशयित समीर पठाण (रा. हुबळी, कर्नाटक) हा फरार आहे.
कुडाळ शहरातील एका पान टपरीवर अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाला मिळाली होती. या पथकाने शनिवारी सायंकाळी उशिरा येथील बाजारपेठतील पान टपरीवर छापा टाकला असता आत अवैध गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा आढळला. या कारवाईत सुमारे 2 लाख 88 हजार 660 रु.चा मुद्देमाल जप्त करत तसेच वरील संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीअंती त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. इमरान करोल व इम्तियाज करोल या दोघांना कुडाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर व अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड हवालदार विल्सन डिसोजा व आशिष जामदार या पथकाने कारवाई केली.