वेंगुर्ला : पावसामुळे अरबी समुद्रात उंच लाटा उसळून समुद्र खवळलेला राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे वेंगुर्ला किनारपट्टी भागात मच्छीमारांनी मच्छीमारीसाठी समुद्रात जाऊ नये असा इशारा मत्स्य विभागाच्या वतीने देण्यात आला. मासेमारीला 1 ऑगस्टपासून सुरुवात होत असताना समुद्र खवळल्याने प्रत्यक्ष मासेमारीला उशिरा सुरुवात होण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रात वातावरण बदलामुळे उंच उंच सागरी लाटा उसळून समुद्र खवळलेला राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्तकेला आहे. पावसामुळे अरबी समुद्राच्या पाण्याच्या पातळीत बुधवारी दुपारनंतर वाढ झाली आहे. समुद्र खवळलेल्या स्थितीत आहे. वेंगुर्ला तालुक्याला रेडीपासून निवती कोचर्यापर्यंत लाभलेल्या किनारपट्टीवर छोट्या मोठ्या मच्छीमारी नौका मासेमारीसाठी जाण्याची शक्यता आहे. समुद्र खवळलेला असल्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे किनार धोकादायक बनला आहे.
या किनार्यावर स्थानिक मच्छीमार्याने मच्छीमारीसाठी किनार्यावर जाऊ नये असा इशारा मत्स्य विभागाने दिला आहे. पावसाचा जोर वाढत असल्यामुळे समुद्र खवळलेल्या स्थितीत आहे. समुद्रात उंच उंच लाटा उसळून किनार्यावर आदळत आहेत. त्यामुळे किनारपट्टी भागाची झीज झाली आहे. त्यामुळे किनारवर्ती भाग खचू लागला आहे.
दरम्यान वेंगुर्ले किनार्यावर पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. हे पर्यटक उत्साहाच्या भरात समुद्राच्या खवळलेल्या पाण्यात जाण्याचा जाण्याची शक्यता आहे. खवळलेल्या समुद्र किनार्यावर आढळणार्या अजस्त्र लाटा समुद्रात खेचून घेण्याची भीती असते. त्यामुळे पर्यटकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.