सिंधुदुर्ग

Sindhudurg rain update: जिल्ह्यात सरीवर सरी! पूरस्थितीमुळे काही गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत

शनिवार सकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे

पुढारी वृत्तसेवा

सिंधुदुर्ग : गेले दोन दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असून, रविवारीही पावसाचा जोर कायम होता. दिवसभर तसेच रात्रीही वादळीवाऱ्यांसह सरीवर सरी कोसळत असून, नदीनाल्यांना पूर आला आहे. अनेक ठिकाणी घरे, गोठे तसेच रस्त्यांवर झाडे कोसळली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरस्थितीमुळे काही गावांचा वाहतूक संपर्क तुटला आहे. तर वीज वाहिन्या तुटल्याने जिल्ह्यातील अनेक गावे काळोखात आहेत.

जिल्ह्यात काही ठिकाणी मोबाईल सेवाही विस्कळीत झाली आहे. कुडाळ तालुक्यातील मांडकुली गावात तुटलेल्या वीज वाहिनीचा स्पर्श होऊन दोन म्हैशी जागीच मृत झाल्या. तर अन्य दोन गुरे गंभीर जखमी झाली. जिल्ह्यांना जोडणाऱ्या घाटमार्गातील वाहतूक सुरळीत असून, मुंबई-गोवा महामार्ग व कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूकही सुरळीत आहे.

शनिवार सकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. विशेषतः हा पाऊस जोरदार सरींच्या स्वरूपात पडत आहे. दोन सरींच्या दरम्यान पाऊस काहीशी विश्रांती घेत असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झालेली नाही. मात्र, अनेक ग्रामीण व राज्य मार्गावर झाडे कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. गगनबावडा व खारेपाटण जोडणाऱ्या भुईबावडा घाटात शनिवारी रात्री उशिरा दरड कोसळली होती. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. मात्र, सा.बां.विभागाने दरड वेळीच हटवल्याने रविवारी या घाटमार्गातील वाहतूक सुरळीत होती.

रायगड, नाशिक, पुणे-सातारा घाटमाथ्याला आज 'रेड अलर्ट' पुणे

मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर अतिवृष्टी सुरूच आहे. रायगड, नाशिक, पुणे-सातारा घाटमाथ्याला सोमवारी (दि. ६) रेड अलर्ट तर मुंबई, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर या जिल्ह्यांना मुसळधारेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT