Bhangsal river has flooded.
भंगसाळ नदीला पूर आला आहे. 
सिंधुदुर्ग

पावसाचे धूमशान : सिंधुदुर्ग जलमय !

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : जिल्ह्यात रविवारी जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने संपूर्ण जिल्हाच जलमय झाला. कुडाळ तालुक्यातील कर्ली (भंगसाळ) नदीला पूर आल्याने पुराचे पाणी शहरातील हॉटेल गुलमोहर समोरच्या मुख्य रस्त्यावर आले. त्यामुळे शहरात येणारा हा मुख्य मार्ग सकाळपासून ठप्प झाला. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील काही घरांना पुराच्या पाण्याने वेढा घातला. कुडाळसह कविलकाटे, वेताळबांबर्डे, पावशी व अन्य नदीकिनारी भागात पुराचे पाणी लोकवस्तीपर्यंत दाखल होऊन घरांना पाण्याने वेढा घातला. अनेक घरांत पाणी शिरून साहित्याचे नुकसान झाले. या ठिकाणच्या नागरिकांनी साहित्यासह सुरक्षितस्थळी स्थलांतर केले.

माणगाव खोर्‍यातील ब्रिटिशकालीन आंबेरी पूल व दुकानवाड पंचक्रोशीतील कॉजवे पाण्याखाली गेल्याने या भागातील नागरिकांची गैरसोय झाली. आंबेरी जुने पूल पाण्याखाली गेले. ठिकठिकाणी सखल भागात रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली. एस.टी., दूरध्वनी, वीज सेवा विस्कळीत झाली. परिणामी, पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी ऑन फिल्ड येत, पूरबाधित भागांना भेट देऊन पाहणी केली. तसेच नागरिकांना खबरदारीच्या सूचना दिल्या. दोडामार्ग तालुक्यातील तेरवण-मेढे उन्नैयी बंधार्‍यातून पाणी विसर्ग वाढल्याने तिलारी नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे.

जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रविवार पहाटेपासून पावसाचा जोर अधिक वाढला.त्यामुळे नद्यांना पूर येऊन नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. मुसळधार पावसाने कुडाळ शहरासह ग्रामीण भाग जलमय झाला. तालुक्यातील माणगांव खोर्‍यात मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर दिवसभर सुरू होता. त्यामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत होते. येथील भंगसाळ (कर्ली) नदीला पूर आला. या पुराचे पाणी नदीकिनारील परिसरात शिरले. शहरातील हॉटेल गुलमोहर समोर मुख्य रस्ता या पुराच्या पाण्याखाली गेला. त्यामुळे सकाळी 11.45 वाजल्यापासून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली. ही वाहतूक उद्यमनगर येथून वळविण्यात आली. रेल्वे स्टेशन रोडला पाण्याने वेढा घातला. तुपटवाडी व लक्ष्मीवाडी येथील ओहोळाचे पाणी रस्त्यावर आले. भंगसाळ बंधारा लगत असलेल्या कृष्णासागर रिसॉर्टलाही पुराच्या पाण्याने वेढा घातला.

तसेच शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरनगर, काळपनाका येथे घरापर्यंत पुराचे पाणी दाखल झाले. तेथील घरांना पुराच्या पाण्याने वेढा घातला. काळपनाका नजीक निवासी संकुलाच्या तळमजल्याला पुराच्या पाण्याने वेढा दिला. पावशी, मुळदे, आंबडपाल, कविलकाटे, पिंगुळी, चेंदवण या नदीकिनारील भागात पुराचे पाणी घरापर्यंत दाखल झाले होते. वेताळबांबर्डे-हातेरी नदीला आलेल्या पुराचे पाणी महामार्गालगत तेलीवाडी व अन्य भागात शिरून घरांना वेढा दिला. तेथे माजी सरपंच दिलीप तिवरेकर व अन्य ग्रामस्थांनी धाव घेत, नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्यास मदत केली. नदीकिनारील भागात घरांमध्ये पुराचे पाणी शिरून साहित्याचे मोठे नुकसान झाले.

पावशी बेलनदी, हुमरमळा पिठढवळ नदी तसेच आंदुर्ले - तेंडोली येथील नदीलाही पूर आला. ग्रामीण भागात सखल भागातील कॉजवे, रस्त्यांवर पाणी आल्याने ठिकठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली. सखल भागात रस्त्यावर पाणी असल्याने वाहतूक खोळंबली. माणगांव खोर्‍यात एसटी व अन्य वाहने पुलाच्या दोन्ही बाजूंना खोळंबली होती. एसटी, वीज, दूरध्वनी सेवा विस्कळीत होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. दिवसभर पावसाचा जोर कायम होता. वेताळबांबर्डे, पणदूर, पावशी, कुडाळ, मुळदे, आंबडपाल, बांबुळी, बांव, सरंबळ, चेंदवण, आंदुर्लेसह अन्य नदीकिनारील भागात पुराचे पाणी शेतमळ्यात शिरल्याने शेतीही पाण्याखाली गेली आहे. भात रोपाच्या पेंढ्या तसेच लावणी वाहून जात शेतीचे नुकसान झाले.

कुडाळ शहरातील काळपनाका येथे सर्व्हिस रोडवर पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. तेथे शहरात येणार्‍या रस्त्यावरूनही पाणी उलटत होते. पोस्ट ऑफिस चौक व जिजामाता चौक येथे मुख्य रस्त्यावर गटाराचे पाणी उलटत होते. त्यामुळे पादचारी नागरिक व वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागला.

कुडाळ तहसीलदार ऑन फिल्ड!

कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे, निवासी नायब तहसीलदार प्रतीक आढाव यांनी ऑन फिल्ड येत शहरासह अन्य पूरबाधित भागांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी नदीकिनारील नागरिकांना खबरदारीच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना दिल्या. काही ठिकाणी तलाठी व महसूल अधिकार्‍यांमार्फत सूचना देण्यात आल्या. पूरबाधित भागात आपले विशेष लक्ष राहणार असून, नागरिकांनी सतर्क रहावे. आपत्कालीन कोणतीही मदत लागल्यास तात्काळ संपर्क करावा, असे आवाहन तहसीलदार वीरसिंग वसावे व निवासी नायब तहसीलदार प्रतीक आढाव यांनी नागरिकांना केले आहे. यावेळी नगरसेवक संतोष शिरसाट, काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे तौसीफ शेख व नागरिक उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT