सिंधुदुर्ग : दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेव कुणकेश्वर तीर्थस्थानी दुसऱ्या श्रावण सोमवारी भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली. सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व शिवसेनेचे उपनेते संजय आंग्रे यांच्या हस्ते श्रीदेव कुणकेश्वरची पहिली पूजा पार पडली.
यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली, अमित रावराणे, शिवसेनेचे देवगड तालुकाप्रमुख अमोल लोके, अक्षय जाधव, हर्षद खरात यांच्यासह देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, स्थानिक ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. देवस्थान ट्रस्टच्यावतीने जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, उद्योजक संजय आंग्रे व त्यांच्या कुटुंबीयांचा ट्रस्टचे अध्यक्ष श्री. तेली यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच शिवसेनेचे तालुकाप्रमुख अमोल लोके यांनीही श्री. दहिकर यांचा सत्कार केला.
पहिल्या पूजेनंत सकाळी ६ वा. पासून भाविकांना दर्शन रांग सुरू करण्यात आली. हर हर महादेव मित्रमंडळ, राजापूरच्या सदस्यांनी राजापूर ते कुणकेश्वर अशी पायीवारी काढून श्रीदेव कुणकेश्वरचे दर्शन घेतले. सलग सात वर्षे हे मित्रमंडळ पायीवारीचे आयोजन करीत आहे. त्यांचा श्रीदेव कुणकेश्वर ट्रस्टच्यावतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रीदेव कुणकेश्वराचे दर्शन घेतले.
माजी आमदार वैभव नाईक यांनीही श्रीदेव कुणकेश्वरचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान ट्रस्टच्यावतीने अध्यक्ष श्री. तेली यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष गणेश वाळके, युवासेना देवगड तालुकाप्रमुख गणेश गावकर, मालवण युवासेना समन्वयक मंदार ओरसकर, कणकवली युवासेना समन्वयक तेजस राणे, शिवसेना कलमठ शहरप्रमुख धीरज मेस्त्री, युवासेना मालवण शहरप्रमुख सिद्धेश मांजरेकर, ट्रस्टचे सचिव हेमंत वातकर, खजिनदार उदय पेडणेकर, सदस्य संतोष लाड, संजय वाळके, शैलेश बोंडाळे, महेश जोईल, विलास वाळके, मंगेश पेडणेकर, अनिल धुरी, दीपक घाडी, प्रमोद साटम, श्रीकृष्ण बोंडाळे, विलास कुलकर्णी, महेश ताम्हणकर आदी उपस्थित होते. दुसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवा, कर्नाटक येथील भाविकांनी श्रीदेव कुणकेश्वराचे दर्शन घेतले.