वैभववाडी : करूळ चेक नाक्यावर गोवा बनावटीची दारूची वाहतूक करणारा ट्रेलर वैभववाडी पोलिसांनी जप्त केला आहे. यातून सुमारे 36 लाख 96 हजार रुपयांची गोवा बनावटीची दारू व 23 लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा ट्रेलर असा एकूण 59 लाख 96 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चालक नवीन सुरेश कुमार (वय 29, रा. कदम, ता. भिवानी, राज्य हरियाणा) व वीरेंद्र भरतसिंग (42, रा. अजमपूर तालुका हंसी, राज्य हरियाणा) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी सकाळी पावणेसहा वाजताच्या सुमारास करण्यात आली.
वैभववाडी पोलिसांकडून गेल्या 15 दिवसांत गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर केलेली ही तिसरी कारवाई आहे. करूळ चेक नाका येथे पोलिस हवालदार समीर तांबे, रंजीत सावंत, हरिप्रसाद हाके हे ड्युटीवर होते. मंगळवारी सकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास गोव्याहून कोल्हापूरकडे जाणारा 18 चाकी ट्रेलर करूळ चेकनाक्यावर आला असता, नेहमीप्रमाणे तपासणीसाठी त्याला थांबवण्यात आले. चालकाकडे ट्रेलर मध्ये काय आहे? कुठून आलात? कुठे जाणार? अशी चौकशी केली असता चालकांनी आपण गोवा येथून आलो असून लखिंपुर - आसाम येथे जात असल्याचे सांगितले. ट्रेलरमध्ये काय आहे? अशी विचारणा केली असता बायोमास प्युअर ट्रिक्स आहेत, असे सांगितले. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडे पावतीची विचारणा केली असता, त्यांच्याकडून विसंगत माहिती देण्यात येऊ लागली. त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यानी याबाबत वैभववाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जी. जी. माने यांना याबाबत माहिती दिली.
ही माहिती मिळताच पोलीस अधिकारी माने व पोलीस कॉन्स्टेबल हरिष जायभाय हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक पंचासमक्ष पंचनामा करून ट्रेलर वैभववाडी पोलीस ठाणे येथे आणला. याठिकाणी ट्रेलरवर पसरलेली ताडपत्री बाजूला करून पाहिले, त्यावेळी ट्रेलरच्या पाठीमागील बाजूस लाकडी भूशाने भरलेल्या सफेद रंगाच्या पिशव्या होत्या, त्या पिशव्या बाजूला केल्यानंतर ट्रेलरच्या हौदयात लोखंडी पाईपच्या फ्रेमने प्लाऊडचा बॉक्स तयार करण्यात आला होता. या बॉक्सचा प्लाऊड बाजूला काढला असता, पूरा ट्रेलर भरून खाकी पुठ्ठ्याचे बॉक्स सापडले. याची मोजदाद केली असता तब्बल 1100 बॉक्स सापडले. प्रत्येक बॉक्समध्ये 48 बॉटल, प्रत्येक बॉटलची किंमत 70 रुपये अशी एकूण 36 लाख 96 हजार रुपयांची गोवा बनावटीची दारू सापडली.
याप्रकरणी चालक नवीन कुमार व सुरुवातीला क्लीनर म्हणून बतावणी करणारा वीरेंद्र सिंग हा या ट्रेलरचा मालक असल्याचे आरसी बुकावरून स्पष्ट झाले. या दोघांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 ( अ )( ई ) 81, 83 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.करूळ चेक नाक्यावर आत्तापर्यंत दारू वाहतुकीवर करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. वैभववाडी पोलिसाकडून वाहनाची कसून चौकशी केली जात असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे वैभववाडी पोलिसांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
एवढ्या मोठया प्रमाणात चक्क ट्रेलर मधून दारूची वहातूक होत होती. तो ट्रेलर पोलीस ठाणेत आणण्यात आला आहे, ही माहिती समजताच शहरातील नागरिकांनी पोलीस ठाणे येथे हा ट्रेलर पाहण्यासाठी येत होते.मात्र गोव्यापासून वैभववाडी पर्यंत ही गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक सहिसलामत कशी होते, असा प्रश्न विचारला जात आहे.