आंबोली : गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूकप्रकरणी इनोव्हा गाडीसह सुमारे 20 बॉक्स दारू आंबोली पोलिसांकडून जप्त करण्यात आले. सोबत गाडीतील दोन संशयितांना ताब्यात घेत अटक करण्यात आली. ही कारवाई सोमवारी रात्री 9.30 वा. च्या सुमारास करण्यात आली.
सोमवारी रात्री आंबोली पोलीस चेक पोस्टवर नेहमी प्रमाणे वाहन तपासणी सुरू असताना तेथे आलेली इनोव्हा कार थांबविण्याचा इशारा पोलिसांनी केला. मात्र, चालकाने गाडी न थांबवता चौकुळ रस्त्याने पळवली. आंबोली पोलिसांनी या कारचा तत्काळ पाठलाग सुरू केला. तसेच चौकुळ रस्त्यावर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने रस्ता ब्लॉक करून ही गाडी अडवली. सदर इनोव्हा गाडीच्या तपासणी केली असता गाडीत 1 लाख 2 हजार रू. किमतीची गोवा ब्रँडची दारू आढळून आली.
इनोव्हा गाडी किंमत सुमारे 5 लाख व दारू मिळून एकूण 6 लाख 2 हजार रू. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सतीश भीमराव आर्दळकर (37, रा. अडकूर, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) व अविनाश दशरथ पाटील (32, रा. बोंदुर्डी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करत त्यांना अटक करण्यात आली. पोलीस हवालदार संतोष गलोले, रामदास जाधव, लक्ष्मण काळे, मनीष शिंदे आणि गौरव परब यांनी ही कारवाई यशस्वी केली.