वैभववाडी : तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर करूळ चेक नाका येथे गोवा दारूची वाहतूक करणारा ट्रक वैभववाडी पोलिसांनी ताब्यात घेतला. या ट्रकमध्ये सुमारे 23 लाख 52 हजार रुपयांची गोवा दारू सापडून आली. पोलिसांनी ही दारू व सुमारे 18 लाख रुपये किमतीचा ट्रक असा 41 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सोमवारी पहाटे 3.30 वा.च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी ट्रकचालक व मालक राकेश राजू हडपद व नीलेश साहेबराव साळुंखे (दोघेही रा. शिरोळ, जि. कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या चेक नाक्यावर गोवा दारू पकडण्याची गेल्या आठ दिवसांतील ही दुसरी वेळ आहे.
पोलिस कॉन्स्टेबल हरिष जायभाय व अजय बिल्पे हे रविवारी रात्री करूळ चेक नाका येथे ड्युटीवर कार्यरत होते. सोमवारी पहाटे 3.30 वा. च्या सुमारास या चेक नाक्यावर गोव्याहून आलेला एक ट्रक त्यांनी तपासणीसाठी थांबवला. चालकाकडे चौकशी केली असता त्याने आपण गोवा ते नागपूर जात असल्याचे सांगितले, तर त्याच्या सहकार्याने आपण कोल्हापूरला जात असल्याचे सांगितले. या विसंगत माहितीमुळे पोलिसांना संशय आला व त्यांनी ट्रकच्या हौद्यात डोकावून पाहिले असता ट्रकमध्ये दारूचे बॉक्स असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
त्यांनी याबाबत वैभववाडी पोलिस ठाण्यात माहिती दिली असता पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर, पोलिस किरण मेते हे तात्काळ करूळ चेक नाका येथे दाखल झाले. यानंतर ट्रकचा पंचनामा करून तो वैभववाडी पोलिस ठाण्यात आणण्यात आला. ठाण्यात आणून दारूची मोजदाद केली असता ट्रॅकमध्ये गावा दारूचे 700 बॉक्स आढळून आले. या प्रत्येक बॉक्समध्ये 180 मिली.च्या 48 बॉटल होत्या. बाजारभावानुसार या दारूची किंमत सुमारे 23 लाख 52 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी हा सर्व दारू साठा व 18 लाखाचा ट्रक असा सुमारे 41 लाख 52 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. तसेच विनापरवाना दारू वाहतूक केल्या प्रकरणी ट्रक चालक व त्याचा सहकारी अशा दोघांवर गुन्हा दाखल केला.गेल्या आठ दिवसात वैभववाडी पोलिसांनी गोवा दारुवर केलेली ही दुसरी कारवाई आहे. आठ दिवसापूर्वी कुसूर येथे पाच लाखाची गोवा दारू पोलिसांनी जप्त केली होती.