प्रणालीचे फायदे
पर्यटकांना दिलासा - वारंवार तपासणीची त्रासदायक प्रक्रिया संपुष्टात
वेगवान प्रक्रिया-काही सेकंदांत कागदपत्र पडताळणी
त्वरित कारवाई-अवैध कागदपत्रांवर सीमारेषेवरच दंड
भ्रष्टाचारावर मर्यादा-मानवी हस्तक्षेप कमी
बांदा : गोवा सरकारने राज्याच्या प्रमुख सीमांवर अत्याधुनिक डॅशबोर्ड कॅमेरे बसवून ‘गोवा व्हेईकल ऑथेंटिकेशन सिस्टीम’ (GOVa) सुरू केली आहे. या प्रणालीमुळे गोव्यात प्रवेश करणार्या प्रत्येक वाहनाची कागदपत्रे थेट नंबर प्लेटवरून स्कॅन होऊन तपासणी होणार आहे. त्यामुळे सीमारेषेवर एकदाच तपासणी पूर्ण होईल आणि पुढे गोव्यात कुठेही पोलिसांकडून कागदपत्र तपासण्यासाठी वाहनांना अडवले जाणार नाही.
पहिल्या टप्प्यात पत्रादेवी, मोले, पोळे आणि केरी (सत्तरी) या चार प्रमुख सीमाचौक्यांवर प्रत्येकी चार अशा एकूण 16 डॅशबोर्ड कॅमेर्यांची बसवणूक करण्यात आली आहे.
वाहन सीमेवर पोहोचताच नंबरप्लेट स्कॅन होईल आणि संबंधित वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र (RC), विमा (Insurance) आणि प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) यांची वैधता काही सेकंदांत पडताळली जाईल.
सर्व कागदपत्रे योग्य असल्यास वाहनाला थेट गोव्यात प्रवेश दिला जाईल. मात्र अवैध किंवा बनावट कागदपत्र आढळल्यास ‘वाहन अॅप’द्वारे त्वरित चलन फाडले जाईल आणि आवश्यक ती कारवाई करण्यात येईल.
वारंवार तपासणीमुळे होणार्या गैरसोयीबाबत आमदार मायकल लोबो व इतर काही आमदारांनी एकदाच तपासणी करण्याची मागणी केली होती. पोलिस महासंचालकांशी झालेल्या बैठकीनंतर ही मागणी मान्य करण्यात आली असून, ‘जीओव्हीए’ प्रणालीचा प्रारंभ करण्यात आला आहे.
ही यंत्रणा सध्या प्रायोगिक स्वरूपात सुरू आहे. चाचणी काळात कोणत्याही तांत्रिक अडचणी आढळल्या नाहीत तर ती कायमस्वरूपी लागू केली जाणार आहे. सीमेवर नवीन तपासणी नाके उभारण्याचे कामही सुरू आहे.
सिंधुदुर्गासह शेजारच्या जिल्ह्यांतून दरमहा डझनभर पर्यटन सहली गोव्यात जातात. आतापर्यंत मार्गात अनेक ठिकाणी पोलिसांकडून कागदपत्र तपासणीसाठी वाहनांना थांबवले जात होते, ज्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जात होता. नव्या प्रणालीमुळे ही अडचण दूर होऊन प्रवास अधिक वेगवान व सुरळीत होईल.