Illegal Mining Pudhari
सिंधुदुर्ग

Illegal Mining Scam | तळकट पंचक्रोशीत खनिज तस्करांचे रॅकेट सक्रिय !

Illegal Mining Scam | परिसरातील गावांमध्ये खुलेआम खनिज सदृश्य माती उत्खनन; महसूल विभागाच्या भूमिकेवर ग्रामस्थांचा संशय

पुढारी वृत्तसेवा

दोडामार्ग : पुढारी वृत्तसेवा

दोडामार्ग तालुक्यातील तळकट महसूल मंडळाच्या अखत्यारीत येणाऱ्या तळकट, कुंब्रल, भिकेकोनाळ, सासोली, मोरगाव आणि आडाळी या गावांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या कथित खनिज सदृश्य माती उत्खननाने आता गंभीर स्वरूप धारण केले आहे.

संपूर्ण परिसरात खनिज तस्करांचे रॅकेट सक्रिय झाले असून प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सुरू असलेल्या या प्रकारामुळे महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे मागील तीन वर्षांपासून या गोष्टीकडे कानाडोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर वरिष्ठ काय कारवाई करतात? शासनाचा बुडालेला महसूल या अधिकाऱ्यांकडून वसूल करण्यात येईल का? असे अनेक सवाल आहेत.

दोडामार्ग तालुका हा हिरवाईने नटलेला, घनदाट जंगलांनी व्यापलेला, समृद्ध जैवविविधतेने परिपूर्ण आणि निसर्गसंपन्न आहे. या तालुक्यातील आडाळी, कुंब्रल, तळकट आणि सासोली या गावांमध्ये मागील दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात मायनिंग सुरू असल्याच्या चर्चा होत्या. यंदा त्या आणखी तीव्र झाल्या आहेत.

रात्रीच्या वेळी डंपर, जेसीबी आणि मोठमोठी यंत्रे वापरून माती उत्खनन केले जात असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ करत आहेत. रोजगाराच्या नावाखाली गाव उद्ध्वस्त करण्याचा उद्योग सुरू आहे का? असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारू लागले आहेत. एमआयडीसीच्या नावाखाली मायनिंग? आडाळी परिसरात एमआयडीसीमुळे स्थानिक युवकांना रोजगार मिळेल, उद्योग येतील, विकास होईल, अशी आश्वासने दिली गेली होती.

मात्र प्रत्यक्षात उद्योगधंदे आले नाहीत, रोजगार निर्माण झाला नाही; उलट परिसरात माती आणि खनिज उत्खननाचा अवैध व्यवसाय तेजीत सुरू झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे एमआयडीसीच्या आडून खनिज माफियांचा खेळ सुरू आहे का? असा संशय ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. सासोलीत परप्रांतीय कंपनी आल्यानंतर वाढला उत्खननाचा वेग सासोली येथे एका परप्रांतीय कंपनीचे आगमन झाल्यानंतर परिसरात मायनिंगचा वेग प्रचंड वाढल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

दिवसाढवळ्या आणि विशेषतः रात्री डंपरची अविरत वाहतूक सुरू असल्याचा आरोप होत आहे. या सर्व हालचाली महसूल प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि संबंधित विभागांच्या नजरेतून कशा सुटतात ? असा संतप्त सवाल केला जात आहे.

तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय या सर्व प्रकारात सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे संबंधित गावांचे तलाठी आणि मंडळ अधिकारी नेमके किती वर्षांपासून त्या ठिकाणी कार्यरत आहेत ? उत्खनन सुरू असताना त्यांनी किती पंचनामे केले? किती अहवाल वरिष्ठांकडे पाठवले? महसूल प्रशासनाच्या निदर्शनास हा प्रकार वारंवार येऊनही कारवाई का होत नाही ? असे अनेक प्रश्न जनतेतून होत आहेत

जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करावा

या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित महसूल अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी तसेच अवैध उत्खननात सहभागी व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. तसेच रात्रीच्या उत्खननावर तात्काळ बंदी घालून पोलिस, महसूल आणि खनिकर्म विभागाचे संयुक्त पथक स्थापन करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. दोडामार्ग तालुक्यात सुरू हा कथित खनिज माफियांचा खेळ रोखण्यासाठी प्रशासन जागे होणार का ? की पुन्हा एकदा फक्त कागदी कारवाईतच सर्व काही दडपले जाणार? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

आंदोलनानंतरही कारवाई शून्य

या कथित खनिज तस्करीविरोधात गेल्या महिन्यात स्थानिकांनी आंदोलन छेडले होते. त्यावेळी तहसीलदारांनी रात्री गस्त घालण्यासाठी विशेष पथक नेमण्याचे लेखी आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले होते. मात्र त्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. उलट रात्रीच्या वेळी उत्खनन आणि वाहतूक अधिकच वाढल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT