सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग : शिराळे गावात ४५० वर्षांपासून जपली जातेय ‘गावपाळण’ परंपरा

दिनेश चोरगे

वैभववाडी; पुढारी वृत्तसेवा : शिराळे (ता. वैभववाडी ) गावात आजपासून (दि.१९) 'गावपाळण' परंपरेला सुरूवात झाली आहे. ही परंपरा शिराळे गावात ४५० वर्षांपासून जपली जाते. शिराळेवासियांनी आपली पाळीव जनावरे घेऊन गावाच्या हद्दीत असलेल्या दडोबाच्या पायथ्याशी राहुट्यामध्ये आज आपला संसार थाटला. देवीचा कौल होईपर्यंत पुढचे काही दिवस ते तिथे वास्तव्य करणार आहेत. अन्नधान्य व जीवनाश्यक वस्तुसह अबालवृध्द या गावपळणीत सहभागी झाले आहेत.

वैभववाडीपासून सुमारे १५ कि.मी. अंतरावर सह्याद्रीच्या कुशित वसलेले शिराळे हे स्वतंत्र महसूली गाव आहे. गावात सुमारे ८० कुटुंबे असून ३५० लोकसंख्या असलेले हे छोटेसे गाव आहे. दरवर्षी पौष महिन्याच्या सुरुवातीला शिराळे गावची गावपळण सुरू होते.  गावचे ग्रामदैवत श्री गांगेश्वराने कौल दिल्यानंतर शुक्रवारी (दि.१९) दुपारनंतर शिराळेवासियांनी गाव सोडले. सडुरे गावच्या हद्दीत माळरानावर ४० राहुट्या उभारुन या राहुट्यांमध्ये गावकऱ्यांनी संसार थाटला. राहुट्यांसमोरच गुरे बांधण्यासाठी गाताडी बांधल्या आहेत.

ज्या दिवशी घरातून बाहेर पडतात तो दिवस गृहित धरला जात नाही. गावपळणीनंतर पहिले तीन दिवस कोणीही ग्रामस्थ गावाकडे फिरत नाही. गावपळणी दरम्यान गावातील प्राथमिक शाळाही राहुट्यानजीक असलेल्या आंब्याच्या झाडाखाली भरविली जाते. एस.टी.बस थांबाही तिथेच होतो. गावपळणी दरम्यान लगतच असलेल्या शुकनदी पात्रातील झ-यातील पाणी ग्रामस्थ पिण्यासाठी वापरतात.

धावपळीच्या युगात शिराळेवासीय गावपळणी दरम्यान निर्सगाच्या सानिध्यात एकत्र कुटुंब पध्दतीने राहतात. टी.व्ही. मोबाईलच्या दुनियेत हरवलेला थेट संवाद या गावपळणी दरम्यान ग्रामस्थांमध्ये पहायला मिळतो. दिवसभर ग्रामस्थ  गप्पा गोष्टी करतात, मुले मनसोक्त खेळतात बागडतात, तर राञी भजन करत आनंद घेतात. तीन दिवसानंतर परत ग्रामदैवत गांगेश्वराला कौल लावून हुकूम घेतला जातो. देवाने हुकुम दिल्यानंतर पाच किंवा सात दिवासाने परत गावात जातात. दरवर्षी गावपळण होणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिराळे हे एकमेव गाव आहे. दरवर्षी होणाऱ्या या गावपाळण परंपरेत गावकरी मोठ्या श्रध्देने सहभागी होतात. या गावपळणीचा आनंद घेण्यासाठी चाकरमानीही गावात दाखल होतात. गेले तीन चार दिवस तालुक्यात कडाक्याची थंडी पडत आहे. या कडाक्याच्या थंडीतही गावपळणीत गावातील अबालवृध्द मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT