सावंतवाडी : कोकणातील मुख्य सण गणेशोत्सव जवळ येत असून या पार्श्वभूमीवर गणेश शाळांना अखंडित वीज पुरवठा व्हावा, वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार थांबवावेत यासाठी सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकार्यांनी उपकार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांची भेट घेतली. वीज ग्राहक संघटना स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्याच्या विरोधात असून ग्राहकांना फसवून एकही मीटर बसवू नये, असे आवाहन ग्राहकांनी यावेळी उपकार्यकारी अभियंता श्री. राक्षे यांनी केले.
सहा.अभियंता श्रीम.वीणा मठकर, सहा.अभियंते विठ्ठल काटकर ग्रामीण- 2 यांच्यासह वीज ग्राहक संघटना जिल्हाध्यक्ष संजय लाड, जिल्हा सचिव दीपक पटेकर, जिल्हा उपाध्यक्ष बाळ बोर्डेकर, तालुका सचिव संतोष तावडे, तुकाराम म्हापसेकर आदी उपस्थित होते.
आता गणेशोत्सव तोंडावर आला आहे. प्रत्येक गावात किमान दोन ते चार गणपती शाळा आहेत. त्यामुळे गावातील वीज पुरवठा जास्त वेळ खंडित राहू नये यासाठी काय तयारी केली? या प्रश्नावर श्री.राक्षे यांनी मेन लाईन आणि एलटी लाईनवरील झाडी तोडण्याचे काम प्राधान्याने घेतल्याचे सांगून कुणकेरी येथील झाडी तोडण्यासाठी पगारावर मदतनीस देण्याची मागणी केली. त्यावर पदाधिकार्यांनी कामगार देतो असे सांगितले. संचयनी जवळील औदुंबर झाडाची धोकादायक फांदी तोडण्याबाबत देखील चर्चा झाली, परंतु ती तोडण्यासाठी खर्च कोणी पेलावा? यावर चर्चा अडली. त्यावरही लवकरच तोडगा काढण्याचे ठरविण्यात आले.
सावंतवाडी शहरातील वीज वाहिन्या अंडरग्राऊंड करण्यासाठी निधीची मागणी केल्याचे त्याचप्रमाणे सावंतवाडी शहरासाठी वीज पुरवठा करण्यात येणार्या वीज वाहिन्यांचे चार पर्याय उपलब्ध असल्याचे, सब स्टेशनमध्ये एखाद्या ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्यास अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून ठेवल्याचे त्यांनी सांगितले. मळेवाड - तळवडे या नवीन लाईनचे काम पूर्ण झाले असून सुरक्षा टेस्ट झाल्यावर ती सुरू करण्यात येईल. गणेशोत्सवापूर्वी ओटवणे येथील वीज वाहिनीचे काम पूर्णत्वास नेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. वीज ग्राहकांनी स्मार्ट प्रीपेड मीटर आपल्या घरी बसवू नये यासाठीचे छापील अर्ज भरून कार्यालयात देत पोच घेतली. चर्चेसाठी श्यामसुंदर रेडकर, मनोज घाटकर, श्रीकृष्ण तेली, जीवन लाड, प्रमोद मेस्त्री, तेजस लाड आदी पदाधिकारी, वीज ग्राहक उपस्थित होते.
सावंतवाडी तालुक्यात वीज खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. याबाबत सहा.अभियंता शहर - 2 च्या श्रीम.मठकर यांना विचारले असता, त्या म्हणाल्या गेल्या वर्षीपर्यंत शहरातील वीज मागणीचा दाब 110 किलोवॅट होता तो वाढून यावर्षी 150 किलोवॅट पर्यंत गेल्याने वीज खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेेत. त्याचबरोबर शहरात अन्य ठिकाणी काही समस्या निर्माण झाली तर तेथील सप्लाय बंद करण्यासाठी काही क्षण मेन लाईन बंद करावी लागते. अशावेळी वीज ट्रिप झाली आणि काही क्षणात आली म्हणजे खंडित होत नाही तर सुरक्षित काम करण्यासाठी तसे करावे लागते. लवकरच यावर तोडगा काढला जाईल असे त्यांनी आश्वस्त केले.