कणकवली : गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्याशी चर्चा करताना संतोष कानडे व मूर्तिकार.  (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Ganesh Idol Makers Financial Aid | गणेश मूर्तिकारांना अर्थसहाय्याची रक्कम तत्काळ द्या!

मूर्तिकार संघटनेची कणकवली गटविकास अधिकार्‍यांकडे मागणी

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : सिंधुरत्न योजनेतून जिल्ह्यातील गणेश मूर्तिकारांना अर्थसाहाय्य देण्याच्या योजनेअंतर्गत मार्चमध्ये जिल्हा परिषद जवळ पैसे जमा होऊन देखील अद्यापही रक्कम मूर्तिकारांना मिळालेली नाही. गणेश मूर्तिकारांना सध्या अर्थसाहाय्यची गरज असताना ही रक्कम वेळेत मिळाली नाही तर त्याचा उपयोग काय? असा सवाल करत भजनी कलाकार संस्थेचे अध्यक्ष व कलाकार मानधन समिती जिल्हाध्यक्ष संतोष कानडे यांच्यासहित कणकवली तालुक्यातील गणेश चित्र शाळांमधील मूर्तिकार संघटनेच्यावतीने भेट घेत चर्चा केली. गटविकास अधिकारी यांनी यासंदर्भात ओरोस येथे बैठक असून येत्या दोन दिवसात ही रक्कम पात्र मूर्तिकारांच्या बँक खात्यावर जमा होईल अशी ग्वाही दिली.

सिंधुरत्न योजनेअंतर्गत गणेश मूर्तिकारांना अर्थसहाय देण्याची योजना गतवर्षी सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत पैसे जिल्हा परिषद जवळ मार्चमध्ये जमा झाले. परंतु या संदर्भात प्रत्यक्ष कार्यवाही झाली नाही, असा मुद्दा संतोष कानडे यांनी मांडला. तसेच जि. प. च्या उदासीन भूमिकेवरही मूर्तिकार संघटनेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. या संदर्भात जिल्हा परिषद स्तरावर चर्चा करण्यात आली असून कणकवली तालुक्यातील 182 प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे.

त्यानंतर काही प्रस्ताव आले असून हे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती गटविकास अधिकारी श्री. चव्हाण यांनी दिली. परंतु मूर्तीकारांना वेळीच अर्थसहाय्य दिल्यास त्याचा उपयोग होणार आहे. माती मळणी यंत्र व कॉम्प्रेसर या दोन बाबींसाठी हे अर्थसहाय्य दिले जात होते. परंतु सुरुवातीच्या काळात 50 हजार रुपये प्रति मूर्तीकार अशी निकष होता. परंतु हे पैसे आता कमी झाल्याने मूर्तीकारांना निदान पैसे वेळेत मिळाले पाहिजेत अशी मागणी श्री. कानडे यांनी केली.

त्यावर गटविकास अधिकारी श्री. चव्हाण यांनी जिल्हास्तरावर या संदर्भात मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाल्याने जास्तीच्या मूर्तिकारांना लाभ मिळावा या हेतूने 20 हजार रुपये प्रति मूर्तीकार असा निकष करण्यात आला आहे. तसेच मूर्तीकारांनी कॉम्प्रेसर किंवा माती मळणी यंत्र घेतल्यावर त्या संदर्भातील जीएसटीचे बिल सादर करणे गरजेचे आहे. जिल्हास्तरावरून यासंदर्भात प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु आजच्या घडीला मूर्तीकारांना असलेली गरज ओळखून ही वस्तुस्थितीची पडताळणी आठ दिवसानंतर केली जाईल.

तत्पूर्वी बैठकीत हा मुद्दा उपस्थित करून जिल्हास्तरावरून निधी तालुक्यावर वर्ग झाल्यानंतर ज्या प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे व त्यांची जीएसटीची बिले प्रस्तावासोबत सादर केली आहेत, अशांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली जाईल अशी ग्वाही श्री. चव्हाण यांनी दिली. त्यावर मूर्तिकार संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी या योजनेअंतर्गत दिलेल्या निकषांमधील यंत्र खरेदी करण्याकरिता किमान 50 हजार रक्कम आवश्यक असल्याचे सांगितले. विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, मूर्तिकार रवी राणे, जितेंद्र दळवी, सागर मेस्त्री, मंगेश मेस्त्री, रवींद्र राणे, प्रफुल्ल तळेकर, सुभाष चाळके, नागेश मेस्त्री, भावेश गोसावी, नंदकुमार चव्हाण, सतीश मुरकर, स्वप्निल राणे, मयूर ठाकूर, प्रथमेश मठकर, विकास गुरव, श्यामसुंदर मेस्त्री आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT