विवेक गोगटे
आडेली : गणेशोत्सवातील एक महत्वाचा धार्मिक विधी असलेला ‘ओवसा पूजन’साठी घराघरात महिलांची व नवविवाहीत दांपत्यांची लगबग सुरू आहे. या उत्सवातील ‘गौरीच्या ओवश्यासाठी’ लागणारे सूप व सुपल्या विणण्याची कामे ग्रामीण भागात युद्ध पातळीवर सुरू आहेत.
‘सुप’ हे घरातील सुबत्तेचं लक्षण मानले जाते. धनधान्याने भरलेले सुप देणे हे ऐश्वर्याचे आणि मांगल्याचे प्रतीक असते. गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत करणार्या गौरी सोहळ्याचे कोकणात विशेष महत्त्व आहे. कोकणातील काही भागात गौरीपूजनामध्ये ‘ओवसा’ परंपरा दिसून येते. ‘ओवसा’ म्हणजे ओवासणे अथवा ओवाळणे. लग्न होऊन सासरी आलेल्या नववधू सुवासिनींकडून गौरीची पाच सुपे फळे,फुलांनी भरून पूजन करण्यात येते. परंपरेने आलेले रीतीरिवाजानुसार त्याला ‘ओवसा’ म्हणतात. गौरीला सुपातून ‘ओवसा’ देण्याची पद्धत असल्याने सुपांच्या मागणीत वाढ झाली आहे.
आधुनिक युगात बुरुड व्यवसाय लोप पावत असला तरी ही कला जिवंत ठेवण्याचे काम जिल्हाभरातील हरिजन वाड्यातील महिला करत आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीपासून गणपती सणापर्यंत हरिजन वाड्यातील काही घरांमधून ‘सुपे’ बनविण्यात येतात. या व्यवसायात फार नफा मिळत नसला तरी त्याकडे एक जोडधंदा म्हणून पाहिले जाते. ‘सुप’ तयार करण्यासाठी बांबूचा वापर केला जातो. एका बांबूच्या काठीत दोन सुपे बनतात. एका बांबूचा दर साधारणपणे 100 ते 120 रु.पर्यंत असतो.
यासाठी प्रथम बांबूचे दोर सोलण्याचे काम पुरुष मंडळी करतात, तर महिला ‘सुप’ विणतात. बांबु पासून तयार केलेले हे ‘सुप’ लवकर खराब होऊ नये, त्याला कीड, वाळवी लागू नये, यासाठी बेळांवर(बांबुचे दोर) करण्यात येणारी प्रक्रिया तसेच बनवलेल्या वस्तू सुशोभित दिसण्यासाठी त्यांचर रंगाचा वापर कसा करावा याची दक्षता या महिलांकडून घेतली जाते.
बाजारात सुपाच्या जोडीची किंमत सुमारे 700 ते 750 रू. असून छोट्या सुपल्यांची किंमत प्रती जोडी 200 ते 250 रुपये आहे. गावातील प्रत्येक घरामध्ये व घरातील प्रत्येक सुवासिनी स्त्री मागे ओवश्यासाठी एका सुपाच्या जोडीची गरज असते. हरिजन वाड्यातील व्यावसायिक आपल्या कुळांना मागणीप्रमाणे पुरवठा करतात, तर ज्या कुटुंबामध्ये ‘सुपे’ विणण्याची कामे केली जात नाहीत त्या कुटुंबीयांकडून इतरत्र वस्तू विकत घेऊन ‘ना नफा, ना तोटा’ या तत्वावर आपल्या कुळांना मागणीनुसार सुपे देण्याचे काम करतात.
शेतीवर अवलंबून असलेले कित्येक गृह उद्योग नामशेष होत आहेत. यातीलच हरिजन समाजाचा बांबूपासून सूप,टोपल्या बनवण्याचा व्यवसाय अडचणीत आला आहे. हा व्यवसाय आता फक्त प्रथा परंपरांना आणि पूजेसाठी लागणार्या वस्तूंपुरता टिकून राहिला आहे. प्लास्टिकच्या अतिक्रमणामुळे या व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. फक्त पूजा, लग्नविधी व इतरत्र धार्मिक विधीला लागणारे साहित्य एवढ्याच वस्तुंना मागणी असल्याचे या व्यावसायिकांनी सांगितले.