सिंधुदुर्ग : लाडक्या गणपतीचे आगमन झाल्यानंतर रविवारी सोनपावलांनी गौरीचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात घरोघरी आगमन झाले. सोमवारी गौरीचे पूजन होणार असून मंगळवारी गौरीचे विर्सजन होईल. गौरी आगमनावेळी महिला वर्गाचा अमाप उत्साह दिसून आला. गौराईच्या आगमनामुळे घराघरांत आनंदाचे वातावरण होते.
माहेरवाशीण असलेल्या महालक्ष्मी तथा गौराई अनेक घरांमध्ये पिढ्यान्पिढ्या बसविल्या जातात. काही घरांमध्ये नवसाच्या तर काहीजण हौस म्हणून गौराई बसवतात. पारंपरिक पद्धतीने आघाडा, तिरडा, सोंतळ या वनस्पती घेऊन विहिरी, नदीकिनारी जाऊन या वनस्पतींची विधिवत पूजा करून गौराई आणली जाते.
स्थळपरत्वे गौरीच्या पूजेची पद्धत आणि परंपरा वेगळ्या आहेत. काही कुटुंबात गौरीचे मुखवटे असतात. तर काही कुटुंबात परंपरेनुसार पाणवठ्यावर जाऊन पाच, सात किंवा अकरा खडे आणून त्यांची पूजा करतात. काही ठिकाणी पाच मडक्यांच्या उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे लावून त्या उतरंडीनाच साडी चोळी नेसवतात आणि त्यांची पूजा करतात. धान्याची रास म्हणजेच गहू, तांदूळ, ज्वारी, हरभरा, डाळ आदींपैकी एक दोन धान्याचे ढीग करून त्यावर मुखवटे ठेवून त्यांची पूजा केली जाते.