ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाच दिवसांच्या गणेशमूर्तींचे रविवारी सायंकाळी ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आताशबाजीत विसर्जन करण्यात आले. जिल्हाभरात मिळून सुमारे 17 हजार 707 खासगी, तर 3 सार्वजनिक गणेशमूर्तींचे पाचव्या दिवशी विसर्जन करण्यात आले.
सायं. 4 वा. पासून ग्रामीण व शहरी भागात ठीक ठिकाणी ‘गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात गणेशमूर्तींचे विसर्जन सुरू झाले. जिल्ह्यातील नदी, ओहोळ, तलाव, समुद्र आदी ठिकाणी या गणेशमूर्तींचे पारंपरिक पद्धतीने विर्सजन करत गणेशभक्तांनी लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. दुपारनंतर पावसानेही काहीशी उसंत घेतल्याने भाविकांना सुलभपणे मूर्ती विसर्जन करता आले.
विर्सजनासाठी गणेश घाटांवर मोठी गर्दी झाली होती. विर्सजनापूर्वी बाप्पांची आरती करत व सर्वांच्या सुख-समृद्धी व रक्षणासाठी गार्हाणे घालत बाप्पांना निरोप देण्यात आला. शहरांच्या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत गणपती विसर्जन सुरू होते. यासाठी गणेश घाटांवर संबंधित न. पं., ग्रामपंचायत यांच्या वतीने लाईट, बोटी आदीं सुविधा पुरवण्यात आल्या होत्या.
बांदा पोलिस स्थानक- 1010, दोडामार्ग -2480, सावंतवाडी-2239, वेंगुर्ले-1682, निवती -993, कुडाळ- 2775, सिंधुदुर्गनगरी-661, वैभववाडी- 1125, कणकवली- 1100, विजयदुर्ग-1042, देवगड-285, आचरा -1505, मालवण- 810 असे मिळून 17 हजार 707 गणेशमूर्तींचे विसर्जन झाले.