कुडाळ : गणेशोत्सवानिमित्त जिल्ह्यात वाडीवाडीत ‘सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची...’ या आरतीचे सूर कानावर निनादत आहेत. यामुळे एक भक्तिभावाने भरलेले वातावरण निर्माण झाले आहे. शहरांमध्ये बहुतेक ठिकाणी कुटुंबस्तरावर आपल्या घरगुती बाप्पासमोर आरत्या गातात. मात्र, ग्रामीण भागात अजूनही एकत्र येऊन आरती म्हणण्याची परंपरा टिकून आहे. वाडी-वाड्यांमध्ये सर्व कुटुंब एकत्र येऊन प्रत्येक घरात जाऊन बाप्पासमोर सामूहिक आरत्या म्हणतात, यामुळे केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक नातेसंबंधही घट्ट होतात.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवारपासून गणेशोत्सवाला पारंपरिक थाटात आणि भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे. घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झाले असून जिल्ह्यात या उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. या उत्सवात पारंपरिक आरत्या, भजने, फुगड्या, ढोल-ताशांचे गजर आणि विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांमुळे गावागावात एक विशेष उत्साह पसरला आहे. गणेशोत्सव ही केवळ धार्मिक परंपरा न राहता, सामाजिक एकत्रतेचे प्रतीक बनली आहे. शहराच्या बहुतेक ठिकाणी कुटुंब आपल्या घरगुती बाप्पासमोर आरती म्हणतात. तसेच भजन मंडळांना निमंत्रित करून भजने सादर करण्यात येतात. भजनानंतरही आरती म्हटली जाते.
ग्रामीण भागात वाडीवाडीतील सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन गणपती बाप्पासमोर सामूहिक आरती म्हणतात. कुडाळ तालुक्यातील डिगस- सुर्वेवाडी येथे सामूहिक आरती म्हणण्याची ही परंपरा कायम आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वजण वाडीतील प्रत्येक गणपतीसमोर एकत्र जमून टाळ-मृदुंगाच्या गजरात आरत्या म्हणतात. सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नांची, या श्री गणपतीच्या आरतीसह लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा, दुर्गे दुर्घट भारी अशा विविध पारंपरिक आरत्या दुमदुमत असतात. डिगससह अनेक गावांत ही सामूहिक आरतीची परंपरा वर्षानुवर्ष कायम टिकून आहे. आरतीनंतर सर्वत्र प्रसाद वाटपाचा आनंद पाहायला मिळतो. मुंबईकर चाकरमानीही अगदी उत्साहाने यात सहभागी होतात.
बाप्पाच्या दर्शनासाठी एकमेकांच्या घरी जाणं, आरतीसाठी एकत्र येणं, आणि त्या निमित्ताने नातेसंबंध अधिक दृढ होतात. कोकणातील गणेशोत्सव हा केवळ देवपूजेपुरता मर्यादीत न राहता, एक सामाजिक समृद्धीचा, एकत्रतेचा आणि आनंदाचा पर्वणीचा भाग बनला आहे. संपूर्ण जिल्ह्यात गणेशोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत असून, प्रत्येक गाव, प्रत्येक वाडी आपापल्या परंपरा आणि भक्तिभावाने बाप्पाच्या सेवेत गुंतले आहेत. प्रत्येक गावात, वाडीत, घरात - बाप्पाच्या मूर्तीसमोर बसलेले भक्त डोळ्यांत श्रद्धा, ओठांवर आरती आणि हृदयात गणरायावरची अपार आस्था घेऊन आराधना करत आहेत.