ओरोस : यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अवमान झाल्यास पोलिसांविरोधात कोल्हापूर खंडपीठाकडे याचिका दाखल करणार असल्याचा इशारा मराठा महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अॅड. सुहास सावंत यांनी दिला आहे.
झाराप येथे झालेल्या अपघात प्रसंगी माजी आ. वैभव नाईक यांनी आपल्याला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार महामार्ग प्राधिकरणचे कनिष्ठ अभियंता श्री. साळुंखे यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी वैभव नाईक यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत बोलताना अॅड. सावंत म्हणाले, कोणत्याही अधिकार्याच्या चेहर्यावर त्याची जात लिहिलेली नसते. या प्रकरणात संबंधित अधिकार्याने आपला खोटेपणा लपविण्यासाठी अशाप्रकारे अॅट्रॉसिटीचा खोटा आधार घेतला आहे. अशी प्रवृत्ती बळावल्यास भविष्यात लोकशाही यंत्रणा कोलमडून पडेल. त्यामुळे वैभव नाईक यांच्यावर कारवाई करण्याअगोदर अर्नेश कुमार विरुद्ध बिहार राज्य या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सात वर्षापेक्षा कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यात आरोपीला अटक करता येणार नाही, असा निर्णय दिला असून या नियमाचे पालन पोलिसांनी केले पाहिजे.
या नियमाचे पालन झाले नाही आणि चुकीच्या पद्धतीने वैभव नाईक यांना अटक झाली तर कुडाळ पोलीस अधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विरोधात कोल्हापूर खंडपीठाकडे याचिका दाखल करण्यात येईल, शिवाय उग्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा अखिल अॅड. सुहास सावंत यांनी दिला आहे.
याबाबत अॅड. सुहास सावंत यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी मराठा समाज बांधवांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. मराठा समाजाचे नेते सतीश सावंत, बाबा सावंत, श्रेया परब, सुशांत नाईक, अमरसेन सावंत, मराठा समाज कुडाळ तालुका अध्यक्ष संतोष परब, मराठा विद्यार्थी जिल्हाध्यक्ष अनुपसेन सावंत, सोशल मीडिया अध्यक्ष विनय गायकवाड, कुडाळ युवक अध्यक्ष शैलेश घोगळे, शहर अध्यक्ष योगेश काळप, हर्षद पालव आदी उपस्थित होते.