लांजा : मुंबई-गोवा महामार्गावरून गोवा बनावटीचा दारूसाठा अवैधरित्या वाहतूक करणार्या कंटेनरला पकडून एकूण 2 कोटी 36 लाख 72 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना राजापूर तालुक्यातील पन्हळे तर्फे सौंदळ येथे उघडकीस आली. ही कारवाई 1 सप्टेंबर रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने केली. ऐन गणेशोत्सवात राजापूर तालुक्यात पन्हळे तर्फे सौंदळ येथे झालेल्या या कारवाईमुळे अवैध गोवा बनावटीच्या दारुसाठ्याची वाहतूक करणार्यांना चांगली चपराक बसली आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार कंटेनरमधून गोवा बनावटीच्या दारुची वाहतूक होत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार भरारी पथक मुंबई यांनी राजापूर तालुक्याच्या हद्दीमध्ये मुंबई-गोवा महामार्गावर पन्हळे तर्फे सौंदळ येथील निनादेवी मंदिर येथे गस्त घालत होते.
या दरम्यान विनापरवाना गोवा बनावटीच्या दारु साठ्याची वाहतूक करणारा टाटा कंपनीचा कंटेनर (क्र. आरजे 14 जीके-9464) पकडला. या कारवाईवेळी कंटेनरची तपासणी केली असता कंटेनरमध्ये गोवा बनावटीचे 1 हजार 866 बॉक्स व टाटा कंपनीचा कंटेनर असा एकूण 2 कोटी 36 लाख 72 हजार 280 रुपये किमतीचा मुद्देमाल यावेळी भरारी पथकाने जप्त केला आहे. या प्रकरणी कंटेनर चालकावर गुन्हा दाखल केला आहे.