वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्रात क्रांती घडवू शकणार्या शिरोडा येथील ताज फाईव्ह हॉटेल प्रकल्पाला केंद्र सरकारकडून पर्यावरणीय मंजुरी मिळाल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली आहे. शिरोडा-वेळागर येथील समुद्रकिनार्यावर वेळागर बीचजवळील जमीन ताज हॉटेल या पंचतारांकीत प्रकल्पासाठी राज्य सरकारने संपादित केली आहे.
सध्या ही जमीन ताज हॉटेल कंपनीकडे देण्यात आली आहे. गेली अनेक वर्षे इथे प्रकल्प उभा राहावा यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. जी जागा उपलब्ध आहे अशा ठिकाणी हा प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी पर्यावरणीय मंजुरी आवश्यक होती. त्याचा पाठपुरावा करून अखेर केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. या मंजुरीचे पत्रही पालकमंत्री नितेश राणे यांनी एका पत्रकार परिषदेत सादर केले होते.
शिरोडा येथे ताज प्रकल्पबाबत वरिष्ठ स्तरावर सकारात्मक चर्चा झाली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिला फाईव्ह स्टार प्रकल्प होणार आहे. त्यासाठी पर्यावरण क्लीअरन्सची परवानगी आली आहे. जिल्ह्यात फाईव्ह स्टार हॉटेलचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे रोजगारास चालना मिळून जोडधंद्यानाही चालना मिळणार आहे.
पालकमंत्री म्हणून येथील वेंगुर्ले तालुक्यातील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना नोकर्या देण्यास आपला प्राधान्यक्रम राहणार आहे. त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण निश्चितच देऊ. माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांनी आपला सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा घोषित केला. ताज हॉटेलमुळे पर्यटन विकासाला गती मिळेल असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.