सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण-कुंभारमाठ येथील आंबा बागायतदार शेतकरी उत्तम फोंडेकर व आबा फोंडेकर यांनी यावर्षी हापूस आंब्याची पहिली पेटी दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सातार्या जिल्ह्यात विक्रीसाठी पाठवली होती. या विशेष कार्याबद्दल या बागायतदारांना सरकारकडून शाबासकी देण्यात आली आहे. तीन मंत्र्यांनी अभिनंदनांची पत्रे पाठवून त्यांचे अभिनंदन केले आहे.
गेली पाच वर्षे पहिल्यांदा आंबा जिल्ह्याबाहेर विक्रीसाठी पाठविण्याचा विक्रम उत्तम फोंडेकर यांनी केला आहे. ऐन दिवाळीच्या शुभमुहूर्तावर त्यांनी ही आंबापेटी सातारा जिल्ह्यात विक्रीसाठी पाठवली. लवकर आंबापेटी मार्केटमध्ये आली तर फार मोठी किंमत देवून काही उच्चभ्रू लोक हे आंबे खरेदी करतात. त्यामुळे दरही चांगला मिळतो. उत्तम फोंडेकर यांनी 20 ऑक्टोबर 2025 रोजी ही आंबापेटी पाठवली. जिल्ह्यातील बहुतांश भागात अद्याप मोहर यायला लागला आहे. त्यामुळे प्रत्यक्षा आंबापीक येवून ते बाजारात पोचेपर्यंत आणखी महिना जाईल, असे असताना फोंडेकर यांनी ही किमया करून दाखवली आहे.
सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी याबाबत फोंडेकर यांना पत्र पाठवुन त्यांचे अभिनंदन केले आहेच, त्याशिवाय हापूस आंबा क्षेत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव जगात पोहोचविण्याचे काम केल्याबद्दल कौतुक केले आहे. या कार्याची दखल राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांनीही घेत फोंडेकर यांचे अभिनंदन केले आहे. हापूस आंबा जागतिक स्तरावर पोहोचल्याचा उल्लेख या संदर्भात पाठविलेल्या पत्रात केला आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी फोंडेकर यांना पत्र पाठवून त्यांचा गौरव केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उत्तम फोंडेकर यांना शुभेच्छा दिल्या असून जिल्हा कृषी पुरस्कार 2025 या पुरस्काराने उत्तम फोंडेकर यांना गौरविल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.