fast-unto-death in Vengurle
वेंगुर्ले : पुढारी वृत्तसेवा
वेंगुर्ले आगारातील वाहतूक निरीक्षक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक यांच्या मनमानी व हुकुमशाही कारभाराविरोधात तसेच तात्काळ बदलीसाठी सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ वेंगुर्ला आगारातर्फे गेल्या तीन दिवसांपासून उपोषण सुरू आहे. दरम्यान आज तिसर्या दिवशी एका उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली.
गुरुवार १ मे सकाळी ८.३० वाजल्यापासून सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ वेंगुर्ला आगारातर्फे वेंगुर्ला आगाराच्या गेटवर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. दरम्यान आज शनिवारी ३ मे रोजी तिसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वाजता उपोषणकर्ते सखाराम सावळ यांची प्रकृती खालावली आहे.
सलग तीन दिवस उपोषणामुळे उपोषणकर्ते सखाराम सावळ यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना शासकीय उपजिल्हा रुग्णालयात तात्काळ दाखल करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला. त्यावर त्वरित त्यांना 108 रुग्णवाहिकेच्या सहाय्याने वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे.
या उपोषणस्थळी अद्यापपर्यंत रा. प. महामंडळाच्या एकाही अधिकाऱ्यानी भेट दिलेली नाही. अधिकारी भेट देत नसतील तर हे प्रशासन किती मुजोर आहे हे दिसून येते. त्यामुळे कर्मचारी आपल्या उपोषणावर ठाम आहेत, असे उपोषणकर्त्या पदाधिकऱ्यांनी स्पष्ट केले. या उपोषणात अन्य चार पदाधिकारी सहभागी झाले आहेत.
या उपोषणात विभागीय सचिव भरत चव्हाण, आगार सचिव दाजी तळवणेकर, आगार उपाध्यक्ष सखाराम सावळ, विभागीय सहसचिव स्वप्निल रजपूत, विभागीय सदस्य महादेव भगत आदी सहभागी झाले आहेत. या उपोषणस्थळी वेंगुर्ले भाजपा माजी अध्यक्ष सुहास गवंडळकर, भाजपा कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष अशोक राणे यांनी गुरूवारी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. तसेच सायंकाळी उशिरा वेंगुर्ले तहसीलदार यांनी उपोषणस्थळी भेट दिली होती. वेंगुर्ला आगार प्रशासन सुस्थितीने चालवून चालक वाहकांवर होणारा अन्याय थांबावावा या व अन्य मागण्यां संदर्भात हे उपोषण छेडण्यात आले आहे.