वेंगुर्ले : वेंगुर्ले शहरात श्री सातेरी मंदिर नजीक तिठ्यावर आपण पोलीस कर्मचारी असल्याची बतावणी करून चोरीचे प्रकार चालू असल्याचे सांगत रस्त्याने जाणारे विश्वनाथ परशुराम भांगले (84, रा. वेंगुर्ले ) या वृद्धाला गळ्यातील चेन काढण्यास सांगत ती कागदात बांधून पुडी खिशात ठेवण्यास सांगितले. मात्र प्रत्यक्ष पुडीत चेन न ठेवता ती लंपास केल्याची घटना घडली. याबाबत अज्ञात चोरट्यावर वेंगुर्ले पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी सायं. 4 वा. घडली.
वेंगुर्ले शहरात श्री देवी सातेरी मंदिर नजीक तिठ्यावर दुपारी 4 व. च्या सुमारांस दोन व्यक्ती दुचाकीने आल्या. दरम्यान तेथून जाणार्या एका वृद्धास थांबवून, आपण पोलीस कर्मचारी असल्याची बतावणी केली. पुढे पोलीस चेकींग सुरू आहे. त्या चेकींगमध्ये तुमच्या गळ्यातील सोन्याची चेन काढून घेतली जाईल, आम्ही नागरीकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने फिरत आहोत. असे सांगत त्यांनी आपल्या खिशातून कागद बाहेर काढला. या कागदात तुमची चेन काढून ठेवा असे वृद्धाला सांगितले. वृद्धाने चेन कागदांत ठेवताच चोरट्यांनी त्याची पुडी बांधत्त ती वृद्धाच्या हाती दिली.
अन ते दोघे दुचाकीने निघून गेले. मात्र पुढे गेल्यावर चेकींग करणारे पोलीस दिसलेच नाहीत. यामुळे त्या वृद्धाला शंका आली असता त्यांनी खिशातील पुडी उघडून पाहिली असता त्यात दगडाचे खडे दिसून आले. यानंतर विश्वनाथ भांगले (84) यांना याबाबत वेंगुर्ले पोलीस स्टेशनला जात तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात दोन चोरट्यावर फसवणूकिचा गुन्हा सोमवारी रात्रौ उशिरा दाखल करण्यात आला.