Castro Coral Snake 
सिंधुदुर्ग

Castro Coral Snake | वेंगुर्ल्यात पुन्हा आढळला अति दुर्मिळ 'कॅस्ट्रोज कोरल' स्नेक

Castro Coral Snake | सहा वर्षांत चौथ्यांदा जिवंत सापाचे रेस्क्यू | सर्पमित्र महेश राऊळ यांच्या कार्याला पुन्हा यश

पुढारी वृत्तसेवा

वेंगुर्ले : पुढारी वृत्तसेवा
वेंगुर्ला-कॅम्प भटवाडी येथे अति दुर्मिळ 'कॅस्ट्रोज कोरल स्नेक' आढळून आला. सर्पमित्र महेश राऊळ यांनी त्याचे सुरक्षित रेस्क्यू केले. १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी अमित बागवे यांच्या घराच्या अंगणात हा साप दिसून आला. श्री. बागवे यांनी तत्काळ महेश राऊळ यांना दूरध्वनीवरून माहिती दिली.

कॅस्ट्रोज कोरल स्नेक हा अत्यंत दुर्मिळ असल्याने त्याचे दर्शन होणे हीच विशेष बाब मानली जाते. सर्पमित्र महेश राऊळ यांना २०२१ मध्ये प्रथमच या सापाचे रेस्क्यू करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर २०२३ मध्ये दोन वेळा या दुर्मिळ सापाचे रेस्क्यू त्यांनी केले. आता १३ सप्टेंबर रोजी भटवाडी येथे पुन्हा एकदा या सापाचे रेस्क्यू करण्यात आल्याने गेल्या सहा वर्षांत जिवंत कॅस्ट्रोज कोरल स्नेकच्या रेस्क्यूची ही चौथी घटना ठरली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात या सापाची नोंद अत्यंत मोजकी आहे. वन्यजीव अभ्यासक हेमंत ओगले यांना यापूर्वी हा साप मृत अवस्थेत आढळला होता. त्यानंतर जिवंत अवस्थेतील या सापाच्या नोंदी झाल्या असून, त्याच्या अस्तित्वामुळे सिंधुदुर्गच्या जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. या सापाच्या प्रजातीचा अभ्यास सर्पअभ्यासक हेमंत ओगले यांनी केला आहे.

कॅस्ट्रोज कोरल स्नेक हा संपूर्ण पश्चिम घाट परिसरातील प्रदेशनिष्ठ आणि अत्यंत दुर्मिळ साप मानला जातो. विषारी प्रजातींमध्ये मोडणारा हा साप सामान्यतः सहजपणे मानवी नजरेस पडत नाही. त्याचा रंग तपकिरी-काळसर असून, शरीराच्या खालच्या भागावर उठावदार भगवा रंग दिसून येतो. डोक्यावरही भगव्या रंगाची जाड रेषा आढळते.

साधारण दोन ते अडीच फूट लांबीचा हा साप पूर्ण वाढल्यानंतरही करंगळीपेक्षा कमी जाडीचा असतो. दगडाखाली, पालापाचोळ्यात तसेच जमिनीतील सुरक्षित ठिकाणी राहणे त्याला पसंत असते. छोटे बेडूक, सरडे, पाली, गांडूळ आदी त्याचे भक्ष्य असल्याचे अभ्यासकांकडून सांगितले जाते.

धोका जाणवल्यास हा साप शेपटी गोल करून ती जमिनीवर आपटतो आणि आपल्यापासून दूर राहण्याचा इशारा देतो. त्याच्या शरीरावरील वैशिष्ठ्यपूर्ण रंगसंगतीमुळे त्याची ओळख पटण्यास मदत होते. सर्पमित्र महेश राऊळ हे गेल्या अनेक वर्षांपासून मानवी वस्तीत आलेल्या सापांना सुरक्षितपणे रेस्क्यू करून त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे परिसरात ते सर्पमित्र म्हणून सुपरिचित आहेत.

सापांबरोबरच भटक्या प्राणी, जखमी वन्यजीव आणि इतर प्राण्यांच्या बचाव व उपचारासाठीही ते सातत्याने पुढाकार घेतात. महेश राऊळ यांनी सापाला सुरक्षितपणे ताब्यात घेतल्यानंतर त्याला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेत त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. अति दुर्मिळ कॅस्ट्रोज कोरल स्नेकचे पुन्हा एकदा वेंगुर्ल्यात झालेले दर्शन आणि त्याचे सुरक्षित रेस्क्यू यामुळे जिल्ह्याच्या जैवविविधतेची पुन्हा एकदा ठळकपणे नोंद झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT