बांबर्डे : रस्ता ओलांडणारा टस्कर व पिल्लू. pudhari photo
सिंधुदुर्ग

Wildlife Movement In Sindhudurg | हत्ती चंदगडमधून पुन्हा दोडामार्ग तालुक्यात

शेतकर्‍यांमध्ये चिंता व भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

दोडामार्ग : चंदगड तालुक्यातील हत्ती पुन्हा दोडामार्ग तालुक्यात दाखल झाले असून गुरुवारी हे हत्ती बांबर्डे-घाटीवडे परिसरात रस्ता ओलांडताना दिसून आले. येथील स्थानिक दत्ताराम देसाई हे रस्त्यावरून जात असताना ‘गणेश’ नामक टस्कर व मादी पिल्लू रस्ता ओलांडत होते. त्यांना पाहून दत्ताराम देसाई यांनी सुरक्षीत जागी पळ काढत या हत्तींची छबी मोबाईलमध्ये कैद केली.

हत्ती पुन्हा आल्याने तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. मोर्ले येथे एका शेतकर्‍याचा बळी घेतलेला ‘ओंकार’ हत्ती सध्या सावंतवाडी तालुक्यातील बांदा परिसरात व लगतच्या गोवा राज्यात धुमाकूळ घालत आहे. काही महिन्यांपूर्वी तिलारी खोर्‍यात वावरणार्‍या सहा हत्तींच्या कळपापैकी ‘ओंकार’ वगळता उर्वरित पाच हत्ती हे घाटमाथ्यावर चंदगड तालुक्यात निघून गेले होते.

त्यानंतर महिन्याभरापूर्वीच हे हत्ती हेवाळे परिसरात दाखल झाले व काही दिवसात पुन्हा चंदगड तालुक्यात पुन्हा माघारी गेले. त्यामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम देसाई हे दोडामार्ग-वीजघर राज्यमार्गावरून गुरुवारी सकाळी प्रवास करत असताना त्यांना टस्कर व एक पिल्लू रस्ता ओलांडताना दिसले.

त्यांना पाहून जीवाच्या भीतीने त्यांनी दुचाकी सोडून तेथून सुरक्षित ठिकाणी पळ काढला. या दोन्ही हत्तींनी निवांतपणे रस्ता ओलांडला. यावेळी दत्ताराम देसाई यांनी दुरूनच हत्तींचे व्हिडीओ व फोटो मोबाईल मध्ये कैद केले. हत्ती पुन्हा तालुक्यात दाखल झाल्याने परिसरातील शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हत्तींना वेळीच वनविभागाने हाकलवावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT