सावंतवाडी : कोणी काहीही सांगितले तरी तुम्ही निधीची चिंता करू नका. तुमचा भाऊ मंत्रालयात आहे आणि तुमच्या भावाकडे नगर विकास मंत्रालय आहे. कोणताही प्रस्ताव पाठवा, तो आमदार दीपक केसरकर यांच्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावंतवाडी येथील प्रचार सभेत दिली.
सावंतवाडी येथे आयोजित शिवसेनेच्या प्रचार सभेत ते बोलत होते. या सभेत उद्योगमंत्री उदय सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा प्रभाग 7 चे उमेदवार संजू परब, महिला जिल्हाप्रमुख तथा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अॅड.निता कविटकर, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे, अमोल जगताप, विद्याधर परब, परिक्षीत मांजरेकर, प्रेमानंद देसाई, क्लेटस फर्नांडिस, गणेशप्रसाद गवस यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्यमंत्री असताना सावंतवाडीसाठी मंजूर केलेल्या निधीचा उल्लेख केला. नळ पाणी योजनेसाठी 58 कोटी रुपये, संत गाडगेबाबा मंडईसाठी 15 कोटी रुपये, अग्निशमन केंद्रासाठी 5 कोटी रुपये दिल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. आ. दीपक केसरकर यांचे कौतुक करताना, त्यांना आदर्श आमदार आणि अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हटले. केसरकर यांनी सावंतवाडीवर प्रेम केले, म्हणून ते चौथ्यांदा निवडून आले, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री पदावर असताना अडीच वर्षांत अडीच तासांपेक्षा जास्त झोप घेतली नाही. विरोधकांच्या झोपा उडवायला आलो आहे, असे सांगत, जिथे संकट तिथे एकनाथ शिंदे पोहोचल्याचे नमूद केले. सिंधू रत्नयोजना पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करणार. तसेच, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मुंबई-सिंधुदुर्ग अॅक्सेस कंट्रोल (ग्रीन फिल्ड) रस्ता तयार केला जात आहे, ज्यामुळे प्रवासाचा वेळ निम्म्यावर येईल असेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणारच : आ. दीपक केसरकर
आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत आ.दीपक केसरकर यांनी सावंतवाडी शहरात केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडत, शहराच्या शांतता आणि संस्कृतीवर राज्य करण्यासाठी लँड माफियाला थारा न देण्याचे आवाहन केले. केसरकर यांनी सावंतवाडी शहरात गेल्या काही वर्षांत झालेल्या प्रमुख विकास प्रकल्पांची माहिती दिली.
सावंतवाडी पूर्वी कशी होती व आता कशी आहे हे तुम्हाला ज्ञात आहे. स्टॉलच्या विळख्यातून सावंतवाडी आम्ही मुक्त केली. इंदिरा गांधी व्यापारी संकुल निर्माण केले. विकासाच्या गोष्टी बाहेरच्या लोकांनी येऊन आम्हाला सांगू नयेत. पाळणेकोंड धरणाची उंची वाढवली, माजगावला धरण, घारपीतही धरण होतेय.
ज्यांना सावंतवाडीची माहिती नाही ते काय सावंतवाडीचा विकास करणार, लोकांच्या जमिनी बळकवणारे लॅण्ड माफिया शहर ताब्यात घेऊ पाहतात. यांच्या उमेदवाराला दोन शब्द बोलता येत नाही, अशा शब्दात केसरकरांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.