Maharashtra Politics Sindhudurg News
कुडाळ : महाराष्ट्रात पूर्वी स्थगितीचं सरकार होतं आता आमचं समृद्धीचे सरकार आहे. भगव्यासाठी जान कुर्बान करणारे कोकणातील शिवसैनिक हे भगव्याचे वारसदार आहेत, म्हणून मी सांगतो "विरासत से तय नही होते सियासत के फैसले..ये तो उडान तय करेगी की आसमान किसका है" असे शायरीतून टिकेचे बाण सोडत शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठाला लक्ष्य केले.
कुडाळ येथील नवीन एसटी डेपोच्या मैदानावर गुरुवारी आभार यात्रा संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर उद्योगमंत्री उदय सामंत, शिवसेना संपर्क प्रमुख रविंद्र फाटक, आ.निलेश राणे, आ.किरण सामंत, उपनेते संजय आंग्रे, माजी आमदार राजन साळवी, शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजू परब, माजी जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला जिल्हाध्यक्षा वर्षा कुडाळकर, कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर -शिरवलकर, देवगड नगराध्यक्षा साक्षी प्रभू,निता सावंत, बाळा चिंदरकर, अपुर्वा सावंत, अशोक दळवी, दिपवल्मी पडते, रूपेश पावसकर, महेश कांदळगावकर आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सायंकाळी सहा वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांनी या आभार यात्रेला सुरुवात झाली. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नियोजित वेळेपेक्षा चार तास उशिरा आले तरीदेखील आभार यात्रेला कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
यावेळी शिंदे म्हणाले की, कुडाळ येथील सभास्थळी यायला उशीर झाला. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. निलेश या ठिकाणी येताना मी पाहिले,आता गर्दी कमी झाली तरी काही चिंता करू नकोस, या सभेसाठी बऱ्याच लांबून लोक आलेले, त्यांनाही आपआपल्या प्रत्येकाच्या गावात वेळेवर पोहोचले पाहिजे. कोकणातल्या लढवय्या शिवसैनिकांना वंदन करायला आलो आहे; खरं तर आजचा एपिसोड आजचा आणि आनंदाचा प्रसंग असताना एकीकडे आनंद आहे तर दुसरीकडे कश्मीरमध्ये दुर्दैवी घटना घडल्या, म्हणून मी काल काश्मीरमध्ये गेलो आणि आज तिथून थेट कुडाळ मध्ये आलो आहे, हे केवळ निलेश व आपल्या प्रेमा पोटी आलो आहे.
दहशतवादी हल्ल्यात २७ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.यामध्ये ६ जण आपल्या महाराष्ट्रामधील होते.घटनेनंतर खा.श्रीकांत शिंदे यांनी आपली टीम त्याठिकाणी पाठवली होती,त्या ठिकाणच्या लोकांसोबत त्या टीम मार्फत माझी चर्चा सुरू होती. त्यांचे नातेवाईक सुद्धा चिंतेत होते.म्हणून मी त्या ठिकाणी श्रीनगरला सोबत चार विमान घेऊन गेलो, तिथे गेल्यानंतर त्या लोकांना आपला माणूस आला म्हणून आधार वाटला. त्या सर्वांना महाराष्ट्रात हा एकनाथ शिंदे सोबत घेऊन आला. हा हल्ला एका व्यक्तीवर नाही तर देशावर झालेला हल्ला आहे. याला जशास तसे उत्तर देण्याची तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत परिपूर्ण आढावा घेतला आहे. या घटनेनंतर पाकिस्तान धार्जिणा दहशतवाद्यांना धडा शिकविल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. हीच भावना प्रत्येक देश वाचण्याची आहे. या अतिरेक्यांनी धर्म विचारला आणि मग गोळ्या घातल्या. या लोकांना चोख उत्तर दिले जाईल असा विश्वास ना.शिंदे यांनी व्यक्त केला.
आपला हा कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, ही कोकणी माणसं बाळासाहेबांवर प्रेम करणारी आहेत. म्हणून हा भगवा या ठिकाणी फडकत आहे. या भगव्यासाठी जान कुर्बान करणारे कोकणातील शिवसैनिक हे भगव्याचे वारसदार आहेत, म्हणून मी सांगतो "विरासतसे तय नही होते सियासत के फैसले..ये तो उडान तय करेगी की आसमान किसका है"या ठिकाणी निलेश राणे यांच्या खांद्यावर शिवसेनेचा भगवा आहे.निलेश राणे बाहेरून कठोर दिसला असला तरी आतून प्रेमळ आणि गोड आहे. शिवसेनेचा भगवा हाती घेतल्यापासून निलेशने कामावर आणि विकासावर लक्ष दिलेले आहे. नारायण राणे हे बाळासाहेबांच्या मुशीत घडलेले आहेत. आणि त्यांचा निलेश चिरंजीव आहे याचा मला अभिमान आहे, स्वाभिमानाने पेटून उठलेला आणि अडचणीला धावून जाणारा तो खरा शिवसैनिक आहे.या कोकणात शिवसेना आणि महायुतीवर जनतेने विश्वास दाखवून दिलेला आहे. कोकणवासीयांच्या या अपार प्रेमासमोर मी नतमस्तक व्हायला आलो आहे.
कोकणात विधानसभेच्या १५ पैकी १४ जागा महायुतीला मिळाल्या ,त्यामध्ये शिवसेनेच्या ८ जागा आहेत आणि हिंदुत्वाच्या मुळावर आलेल्यांची मशाल जनतेने कायमची विझवून टाकली. कोकणातील माणूस फणसासारखा गोड असतो पण उबाठाला बाहेरून पण काटे आहेत आणि आतून पण काटे आहेत. त्यामुळे कोकणच्या मतदारांनी त्यांचा कायमचा काटा काढून टाकला.उबाठाने नाशिकमध्ये बाळासाहेबांचा नकली आवाज काढला, बाळासाहेबांचा आवाज हा बाळासाहेबांचा होता. बाळासाहेबांचा नकली आवाज काढून त्यांनी चारशेवीसगिरी केली,हे जनतेला पटणार नाही.त्यांनी खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार बदलले, म्हणून एकनाथ शिंदेला लोकांच्या मनातील सरकार आणावं लागलं. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान हे लोक म्हणाले,आम्ही आता जनतेच्या न्यायालयात जाऊ ईव्हीएमच्या विरोधात सुप्रीम कोर्टाच्या विरोधात आरोप केले.जनतेच्या न्यायालयात तुमच्या एकनाथ शिंदेंनी ८० जागा लढवून ६० जागांवर विजय मिळवला तर त्यांनी १०० जागा लढवून आरोपांचा किस काढला तरी २० जागा पदरात पडल्या. तिथेच जनतेने शिक्कामोर्तब केला की,खरी शिवसेना कोण आहे? असे शिंदे यांनी सांगितले.
नारायण राणेंनी सुद्धा या कोकणसाठी जे करायचं ते केल. संधीचं सोनं केलं. राणेंच्या बाबतीत जे काय केलं त्याचे साक्षीदार आपण आहात. तो इतिहास झाला त्यावर मी बोलत नाही.महायुती म्हणून आपण आता काम करत आहोत. इकडे निलेश आहे, तिकडे पालकमंत्री नितेश राणे आहेत दुसरीकडे आपले उदय सामंत डोळस नेते आहेत.म्हणून कोकणचा सर्वांगीण विकास हे भविष्य नसून वर्तमान मध्ये बदलवायचं आहे.
गेल्या अडीच वर्षात हा एकनाथ शिंदे पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रात फिरला.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत एक टिम म्हणून काम केलं.एकीकडे विकासामुळे काम केलं आणि कल्याणकारी योजना सुद्धा राबविल्या. म्हणूनच त्या कामाची पोहोचपावती म्हणून विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला दिली. मी एक शेतकरी शाखाप्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री झालो. नारायण राणे सुद्धा शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री झाले. पण हे काही जणांना आवडत नाही. आम्ही सोन्याचा चमचा घेऊन आलो नाही,पण महाराष्ट्रातील जनतेला सोन्याचे दिवस दाखवण्याचे काम आम्ही करत आहोत. आता आमची दुसरी इनिंग सुरू झाली आहे.मी आता डीसीएम आहे म्हणजेच 'डेडिकेटेड टु कॉमन मॅन' आपला जन्म खुर्चीसाठी नाही तर सर्वसामान्य जनतेतील सेवा करण्यासाठी आहे. काही लोकांनी खुर्चीच्या मोहापोटी कार्यकर्ते गमावले,पक्ष गमावला, चिन्ह गमावलं, मिळवलं काय? बाळासाहेब म्हणायचे सत्ता येते आणि जाते, पण नाव गेलं की काहीही येत नाही. ते नाव टिकवण्याचं काम या एकनाथ शिंदेने केलेलं आहे. आता फाईव्ह स्टार लोकांचा जमाना गेलेला आहे.आता जनतेला काम करणारा कार्यकर्ता हवा असल्याचे शिंदें यांनी सांगितले.
कोकणच्या ७२० किलोमीटर किनारपट्टीला चालना देण्याचे काम आपल्याला करायचा आहे. मत्स्य व्यवसाय आपल्या नितेश राणेंकडे आहे. मासेमारी करणाऱ्या लोकांना त्याचा फायदा असा होईल? यादृष्टीने आपल्याला काम करायचं आहे. कोकणी माणसाने आपल्या मालाचे ब्रँडिंग करण्याचे कौशल्य शिकून घेतलं पाहिजे. कोकणच्या या लाल मातीत काजू,आबा,फणस यावर प्रक्रिया करणारे उद्योग आपल्याला सुरु करावयाचे आहेत. कोकणातील पर्यटनाला व्यावसायिकता आली पाहिजे. आज कोकणात आपण कोस्टल रोडचं काम सुरू केलेलं आहे.