Vengurla Dutch Factory Condition
वेंगुर्ला : देविदास लांजेवार
आपल्या असुरी साम्राज्यवादी महत्त्वकांक्षेपोटी भारतात आलेल्या आणि ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणाऱ्या पोर्तुगीज आणि डचांच्या साम्राज्यवादाची निशाणी असलेल्या वेंगुर्ल्यातील प्रसिद्ध फॅक्टरीचा (वखार) टोलेजंग इमला ढासळला आहे. सुमारे १५ हजार चौरस फूट क्षेत्रात दोन मजली बांधकाम असलेली देखणी मध्ययुगीन वखार आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्त्याच्या समुद्र किनाऱ्यावर असलेल्या या डच फॅक्टरीच्या ३८८ वर्षांच्या वैभवशाली इमारतीची देखभाल आणि दुरुस्ती करण्यास भारतीय पुरातत्व खात्याने कमालीचे दुर्लक्ष आणि कुचराई केल्याने ही इमारत आता भुईसपाट होण्याची चिन्हे आहेत.
पुरातत्व खात्याने वखारीच्या मुख्य प्रवेशद्वारावर लोखंडी गज बसवून काही भागात कोकणातील चिऱ्यांचे बांधकाम केलेले आहे. मात्र या वखारीचा महाकाय डोलारा पेलू शकेल एवढे सामर्थ्य या चिऱ्यात आणि लोखंडी गजातही नाही.
१७ व्या शतकातील कोकण किनारपट्टीवर वेंगुर्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व प्रादेशिक सत्तांमधील राजकीय डावपेच आणि युरोपियन वसाहती सत्तांच्या स्वार्थी हितसंबंधांमध्ये घट्ट गुंतलेलं होतं. इ.स. १६३७ मध्ये डच इस्ट इंडिया कंपनीने गोव्यातील पोर्तुगीज वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी वेंगुर्ल्यात व्यापारी कारखाना स्थापन केला. हा कारखाना १६५५ मध्ये पूर्णत्वास गेला, ज्यात तटबंदी, बुरुज आणि तोफा-धारक सैनिक तैनात होते. या किल्ल्यामुळे वेंगुर्त्यात व्यापार वाढला आणि अनेक देशांतून व्यापार नौका येथे येऊ लागल्या.
या डच वखारीचा उपयोग केवळ व्यापारासाठी न होता, गोव्याच्या डच नाकाबंदीच्या काळात किल्ला म्हणूनही केला गेला. यामुळे वेंगुर्ला हे पश्चिम किनाऱ्यावरील महत्त्वाचे व्यापार केंद्र बनले होते.
वेंगुर्त्याच्या वाढत्या महत्त्वाची दखल छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली. त्यांनी डचांशी सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करून व्यापारास चालना दिली. या सहकार्यातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे तांब्याची आयात, याचा उपयोग शिवराई हे तांब्याचं नाणं टाकण्यासाठी होत असे. ऐतिहासिक नोंदीनुसार, छत्रपती शिवाजी महाराजांनी डच वखारीतून तब्बल ६ लाख पौंड तांबे खरेदी केले होते, यावरून वेंगुर्ल्याचं मराठा अर्थव्यवस्थेतील स्थान अधोरेखित होते.
डच वखारीचा उल्लेख मुघलांच्या घराणेशाही संघर्षातही आढळतो. इ.स. १६८३ मध्ये मुघल बादशहा औरंगजेबाचा मुलगा मोहम्मद अकबर त्याच्याविरुद्ध बंड करून छत्रपती संभाजीराजांच्या आश्रयाला आला, त्याच काळात अकबर काही काळ वेंगुर्त्याच्या डच वखारीत वास्तव्यास होता. त्यानंतर तो पर्शियाकडे निघून गेला. ही घटना वेंगुर्त्याच्या राजकीय महत्त्वावर शिक्कामोर्तब करणारी ठरली.
मात्र, या घडामोडींनंतर वेंगुर्त्याच्या वैभवाला ओहोटी लागली. बंडखोर मुलाला आश्रय दिल्याच्या रागातून औरंगजेबाने वेंगुर्त्यावर हल्ला करण्याचा आदेश दिला. इ.स. १६८४ मध्ये शाहआलमच्या नेतृत्वाखाली मुघल सैन्याने वेंगुर्त्यावर आक्रमण करून डच वखार उदध्वस्त केली. परिणामी, ही वखार कायमची बंद झाली.
अलीकडच्या काळापर्यंत वेंगुर्ल्यातील ही डच वखार लोक विसरूनही गेले होते, त्यामुळे तिची उपेक्षा झाली. पण आजही तिचे अवशेष साम्राज्यवादाच्या इतिहासाची साक्ष देतात.
डच राजवटीची अखेर झाल्यानंतर ब्रिटिशांनी वेंगुर्ल्यावर आपले नियंत्रण प्रस्थापित केले आणि त्याचा समावेश बॉम्बे प्रेसीडेन्सीत केला. यामुळे वेंगुर्त्याचे महत्त्व वाढले आणि इ.स. १८७६ मध्ये वेंगुर्ला हे कोकणातील पहिल्यांदाच नगरपालिका असलेले शहर ठरले.