

मुंबई : राज्य सरकारने सी-प्लेन पर्यटन प्रकल्पाला पुन्हा चालना देण्याचा निर्णय घेतला असून, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत या सेवेसाठी नव्याने निविदा मागवण्यात आल्या आहेत. 2014 मध्ये सुरू झालेली सेवा लोकांमध्ये फारशी लोकप्रिय ठरली नाही. मात्र, यावेळी अधिक वास्तवदर्शी आणि व्यवहार्य द़ृष्टिकोन ठेवून सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
महामंडळाने आठ संभाव्य मार्ग निश्चित केले आहेत, जिथे सी-प्लेन सेवा चालवता येईल. इच्छुक सेवा प्रदात्यांकडून भारतात व परदेशात निविदा मागवण्यात आल्या आहेत. या प्रकल्पासाठीचा मूळ भांडवली खर्च निविदाधारकांकडून केला जाणार असून, सरकार 5 वर्षांच्या कालावधीत गुंतवणुकीची भरपाई करणार आहे. या प्रकल्पासाठी 12 वर्षांपेक्षा जुनी नसलेली 9 ते 19 आसन क्षमतेची सिंगल किंवा ट्विन इंजिन सी-प्लेन विमाने वापरण्यात येणार आहेत. ‘एमटीडीसी’च्या अंतर्गत आर्थिक अभ्यासानुसार, प्रकल्पासाठीचा अंदाजे खर्च 466 कोटी रुपये ते 490 कोटी रुपये होईल. यात 5 विमानांची खरेदी, 6 ठिकाणी जलधारणा उभारणी, परवाने आणि संचालन व्यवस्थेचा समावेश आहे.
या सी-प्लेन पर्यटन सेवेचे दर सुमारे 4,000 रुपये असण्याची शक्यता असून, दरवर्षी 50,000 ते 70,000 प्रवाशांची वाहतूक होईल आणि प्रकल्प 5 ते 7 वर्षांत नफा मिळवू शकेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. 2014 मध्ये सुरू झालेली सेवा लोकांमध्ये फारशी लोकप्रिय ठरली नव्हती. मात्र, यावेळी अधिक वास्तवदर्शी आणि व्यवहार्य द़ृष्टिकोन ठेवून सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. या सेवेमुळे गणपतीपुळे, कोयना, आणि पानशेत यासारख्या इको-टुरिझम स्थळांपर्यंत सहजगत्या पोहोचण्याचा पर्याय मिळणार आहे. त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून, रोजगारनिर्मितीही होणार आहे.
मुंबई-गणपतीपुळे (रत्नागिरी)
मुंबई-कोयना धरण (सातारा)
मुंबई-उजनी धरण (सोलापूर)
मुंबई-गंगापूर धरण (नाशिक)
मांडवा (अलिबाग)-गणपतीपुळे
पानशेत (पुणे)-उजनी धरण
उजनी धरण-कोयना धरण
कोयना धरण-पानशेत