दोडामार्ग : मोबाईल रिचार्जचे पैसे परत मिळवून देण्याचे आमिष दाखवत अज्ञात सायबर भामट्याने एका वृद्धाला तब्बल १ लाख ९३ हजार ५०० रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोडामार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी दिली.
फिर्यादी गुरुदास गोपाळ मणेरीकर (वय ६३, रा. दोडामार्ग-धाटवाडी, साई मंदिरामागे) हे सेवानिवृत्त आहेत. २३ मार्च २०२६ रोजी दुपारी १.३० वा. च्या सुमारास त्यांना एका अज्ञात व्यक्त्तीचा मोबाईलवर फोन आला. संबंधित व्यक्तीने स्वतःला ग्राहक सेवा प्रतिनिधी असल्याचे सांगून, तुमच्या मोबाईल रिचार्जचे १,४९९ रुपये रिफंड मिळणार आहेत. मी सांगतो त्याप्रमाणे मोबाईलमध्ये प्रक्रिया करा, असे सांगितले.
त्या भामट्याच्या सांगण्यानुसार, मणेरीकर यांनी मोबाईलवर गुगलच्या माध्यमातून काही माहिती भरली. त्यानंतर त्यांच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या एका खात्यामधून २५ हजार रुपये, तसेच दुसऱ्या खात्यामधून ९८ हजार ५०० रुपये असे एकूण १ लाख ९३ हजार ५०० रुपये गायब झाले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मणेरीकर यांनी दोडामार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (सी) व ६६ (डी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे करत आहेत.